भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) बरखास्त केल्यानंतर भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडियाचा वादही विकोपाला गेला आहे. त्यामुळे भारतातील बॉक्सिंगपटूंमध्ये आणि राज्य संघटनांमध्ये एकूणच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय बॉक्सिंगमध्ये सुरू असलेली ही कोंडी फोडण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. विविध राज्यांतील १५ सदस्यीय शिष्टमंडळाने गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली आणि हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सोनोवाल बैठक बोलवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
२०१३मध्ये आयएबीएफवर बरखास्तीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर गतवर्षी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक घेऊन बॉक्सिंग इंडिया या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली. मात्र, या संघटनेलाही भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचा गाडा हाकता आला नाही. अध्यक्ष संदीप जजोडिया आणि सरचिटणीस जय कोवळी यांच्याविरोधात सदस्यांनीच अविश्वासदर्शक ठराव मांडून त्यांची हकालपट्टी केली. या संपूर्ण वातावरणात राज्य संघटनांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बॉक्सिंग इंडियाचा कारभार एआयबीएने नेमलेली प्रभारी समिती सांभाळत आहे.
‘‘सद्य:स्थितीला आम्ही अनाथ आहोत आणि राष्ट्रीय संघटना स्थापन व्हावी अशी आमची एकच मागणी आहे. त्या संघटनेला कोणते नाव द्यावे याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, परंतु ती देशातील शिखर संघटना असावी. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन व्हायला हवे. नवीन संघटनेची स्थापना लवकरात लवकर झाल्यास या स्पर्धाचे आयोजन करणे शक्य होईल,’’ असे मत पश्चिम बंगालचे प्रतिनिधी असित बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
‘‘केंद्रीय मंत्र्यांनी आमचे बोलणे ऐकून घेतले असून, गरज भासल्यास बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन दिले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक इंजेती श्रीनिवासन यांच्या अहवालाच्या ते प्रतीक्षेत आहेत,’’ असेही बॅनर्जीनी सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे या बैठकीला आयएबीएफचे अध्यक्ष अभिषेक मटोरिआ आणि सरचिटणीस राजेश भंडारी हेही उपस्थित होते.