व्यवस्थापनावरून वादंग निर्माण झालेल्या बॉक्सिंग इंडियाच्या कार्यकारिणीची १७ जून रोजी बैठक होणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष व सरचिटणीसपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
बॉक्सिंग इंडियाने एका पत्रकाद्वारे कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना याबाबत पत्र पाठविले असून येथे १७ जून रोजी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप जजोदिया व सरचिटणीस जय कवळी यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता. या ठरावापूर्वीच कवळी यांनी आपल्या पदाचा त्याग केला होता. जजोदिया यांच्याविरुद्धचा हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यामुळे जजोदिया यांना पद सोडावे लागले होते. आगामी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेपूर्वी दोन्ही पदांची नव्याने निवडणूक घ्यावी अन्यथा या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना सहभागी होण्यास मनाई केली जाईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बॉक्सिंग इंडियास दिला होता. त्यामुळे बॉक्सिंग इंडियाने १७ जून रोजी दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्याचे ठरविले आहे.
जजोदिया व कवळी यांच्या विरोधातील सदस्यांना ही निवडणूक कायद्यानुसार घेतली जाईल, असा विश्वास वाटत आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभेची कार्यक्रमपत्रिकाही त्याच दिवशी निश्चित केली जाणार आहे.

Story img Loader