भारतीय बॉक्सिंगच्या निवडणुकीतील गेल्या ३२ वर्षांपासूनचा हुकुमशाही आणि भोंगळ कारभार अखेर गुरुवारी संपुष्टात आला. भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात गेल्या तीन तपांनंतर पहिल्यांदाच थेट व्हिडिओ चित्रणासह आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) निरीक्षकांच्या देखरेखीखाली, ३३ राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावत नव्या बॉक्िंसगची मुहूर्तमेढ रोवली. बॉक्सिंग इंडियाच्या मुंबईत झालेल्या निवडणुकीत संदीप जजोडिया हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. सचिवपदासाठीच्या तिहेरी लढतीत महाराष्ट्राच्या जय कवळी यांनी बाजी मारली. या निवडणुकीमुळे भारतीय बॉक्सिंगवर गेल्या दोन वर्षांपासून असलेली ऑलिम्पिक बंदी उठण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र आशियाई स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सना देशाचे प्रतिनिधित्व करता येईल का, याबाबत अद्याप साशंकता आहे.
एआयबीएच्या कायदेशीर विभागाच्या क्लिडोना गाय आणि एआयबीएमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे किशन नरसी या दोन निरीक्षकांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे निवडणूक पार पडली. आता हे निरीक्षक लवकरच आपला अहवाल एआयबीएकडे पाठवणार असून पुढील ४-५ दिवसांत बॉक्सिंग इंडियाला एआयबीएची मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय बॉक्सर्सना आशियाई स्पर्धेत देशाच्या झेंडय़ाखाली उतरण्याची तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ‘‘आशियाई स्पर्धेसाठी भारताचे १३ बॉक्सर्स हे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या चमूत असतील. मात्र त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करता येईल का, याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आम्ही पाठवलेल्या अहवालावर एआयबीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा करून बॉक्सिंग इंडियाला मान्यता द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे नरसी यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या जय कवळी यांच्यासमोर दिल्लीचे रोहित जैन आणि हरयाणाचे राकेश ठाकरन यांनी कडवे आव्हान उभे केले होते. पण भारतीय तसेच महाराष्ट्राच्या बॉक्सिंगसाठी झटणाऱ्या जय कवळी यांनी ३२ मते मिळवून महासचिवपदाचा मान मिळवला. रोहित जैन यांना २७ तर राकेश ठाकरन यांना ४ मते मिळाली. खजिनदारपदासाठी हेमंत कुमार कलिता, खोईबी सलाम आणि डॉ. रुपक देबरॉय यांच्यात लढत होती. पण कलिता यांनी ४१ मते मिळवून बाजी मारली.
भारतीय बॉक्सिंगसाठी ऐतिहासिक दिवस -जय कवळी
अनेक महिन्यांपासून भारतीय बॉक्सिंग संघटना नानाविध समस्यांचा सामना करत होती. त्यावर काही तरी तोडगा निघावा, ही बॉक्सर्ससह प्रशासकांचीही इच्छा होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संदीप जजोडिया आणि उदित सेठ पुढे आले आणि एआयबीएनेही आम्हाला संधी दिली. पारदर्शक आणि शांततामय वातावरणात ही निवडणूक पार पडली असून बॉक्सिंगमध्ये पहिल्यांदाच अशी निवडणूक झाल्याचा आनंद राज्य संघटनांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. त्यामुळे भारतीय बॉक्सिंगसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे, असे महासचिवपदी निवडून आलेल्या जय कवळी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा