आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) मान्यता मिळाल्यानंतर गेले चार महिने राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या बॉक्सिंग इंडियाला अखेर नव्या वर्षांच्या मुहूर्तावर क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी मान्यता दिली.
‘‘बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करत होतो. बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यासाठी आमचा कोणताही आक्षेप नाही,’’ असे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याबाबत बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया म्हणाले, ‘‘बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यामुळे मी क्रीडा मंत्रालयाचा आभारी आहे. आता आम्हाला बॉक्सिंग खेळाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामे पूर्ण करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच बॉक्सिंग इंडियाचे कामकाज पूर्ण ताकदीने सुरू होईल.’’
‘‘बॉक्सिंग इंडियातर्फे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष बॉक्सिंग स्पर्धेसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. मान्यता मिळाल्यामुळे ही स्पर्धा अधिक चांगल्या प्रकारे आयोजित करण्यासाठी आम्हाला बळ मिळाले आहे,’’ असे बॉक्सिंग इंडियाचे सचिव जय कवळी यांनी सांगितले. राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा ८ जानेवारीपासून नागपूर येथे सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा