शिवा थापा तसेच एक वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारी एल. सरिता देवी यांच्यासह तेरा खेळाडूंचा भारतीय संघ चीनमध्ये बॉक्सिंगचा सराव व स्पर्धाकरिता जाणार आहे. या दौऱ्यास एक डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे.
भारतीय संघ तेरा दिवसांचा दौरा करणार असून, त्यामध्ये क्विनान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या स्पर्धेतही सहभागी होणार आहे. या स्पर्धेत चीन, थायलंड, मंगोलिया व दक्षिण कोरियाच्या स्पर्धकांचा समावेश असेल. भारतीय संघात दहा पुरुष व तीन महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी हा स्पर्धात्मक सराव भारतीय खेळाडूंना उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग यांनी सांगितले, या दौऱ्यात स्पर्धेचाही समावेश असल्यामुळे खेळाडूंना खूपच फायदा होणार आहे. या स्पर्धेत अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्यामुळे त्यांच्याकडून आमच्या खेळाडूंना खूप काही शिकावयास मिळणार आहे.
भारतीय संघ-पुरुष-एल. देवेंद्रसिंग (४९ किलो), गौरव बिधुरी (५२ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनीष कौशिक (६० किलो), थॉमस मतेई (६४ किलो), मनदीप जांगरा (६० किलो), विकास कृष्णन (७५ किलो), कुलदीपसिंग (८१ किलो), अमृतप्रीतसिंग (९१ किलो), नरेंद्रकुमार (९१ किलोवर), महिला-पिंकी जांगरा (५१ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), पूजा राणी (७५ किलो).

Story img Loader