ऐन उन्हाळ्यात स्पर्धेचे आयोजन केल्याच्या पाश्र्वभूमीवर कतारमधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेवर बहिष्काराचे सावट जमा झाले आहे. तीव्र उन्हाळ्याच्या हंगामात ही स्पर्धा झाल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याचेच आवाहन जागतिक फुटबॉलपटूंच्या फिफाप्रो या संघटनेने केल्याने २०२२ मधील ही स्पर्धा धोक्यात आली आहे.
कतारमध्ये उन्हाळ्यात आम्ही खेळणार नाही असे फ्रान्सच्या फिलीपे पिआट यांनी स्पष्ट केले. पिआट पुढील आठवडय़ात होणाऱ्या फिफाप्रोच्या निवडणुकीतील एकमेव अध्यक्षीय उमेदवार आहेत. कतारमध्ये उन्हाळ्यात हवामान ४५-५० सेल्सिअस असते. त्यांनी स्टेडियमध्ये वातानुकूलित यंत्रे बसवली तरी मैदानावर इतक्या उष्ण वातावरणात खेळणे जिकिरीचे आहे. हे केवळ खेळणाऱ्या २२ खेळाडूंसाठी नाही. सामन्यांच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या आरोग्याचा प्रश्न आहे. उन्हाळ्यात स्पर्धेचे आयोजन झाल्यास आम्ही खेळणार नाही. या भूमिकेबाबत युइफा आणि फिफा यांना कळवल्याचे पिआट यांनी पुढे सांगितले. आम्ही आमची भूमिका पुरेशा वेळेआधीच स्पष्ट केली आहे. आम्ही इशारा दिला नव्हता असे ते म्हणू शकत नाही. फुटबॉल विश्वचषक साधारणत: जुन-जुलै महिन्यात खेळवण्यात येतो. मात्र या कालावधीत कतारमधील हवामान अतिशय गरम असते. या काळात एवढय़ा प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करणे योग्य असेल की नाही हे ठरवण्यासाठी फिफाने एक सल्लागार समितीची स्थापना केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरिया यांना बाजूला सारत कतारला २०२२ विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क देण्यात आले होते. कतारमध्ये आम्ही हिवाळ्यात खेळू शकतो. त्या हंगामात काहीच समस्या नाही पण उन्हाळ्यात नक्कीच नाही. दरम्यान उष्णतेच्या मुद्याचा आम्ही तितक्या गांभीर्याने विचार केला नव्हता. पण सर्व परिस्थितीचा विचार करता हिवाळ्यात विश्वचषकाच्या आयोजनाच्या पर्यायाचा आम्ही विचार करत असल्याचे फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा