रशियाची निना ब्रॅचिकोवा व जॉर्जियाची ओक्साना कॅल्शिनिकोवा यांनी महिलांच्या जागतिक टेनिस असोसिएशन आयोजित रॉयल इंडियन टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम फेरीत ज्युलिया ग्लेशको (इस्त्रायल) व नोप्पावन लर्टचीकावर्न (थायलंड) यांचा ६-०, ४-६, १०-८ असा पराभव केला.
निना व ओक्साना यांनी पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या तीनही सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये ज्युलिया व नोप्पावन यांना सूर गवसला. त्यांनी बेसलाईवरुन परतीचे सुरेख फटके मारले. तसेच नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. हा सेट घेत त्यांनी सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या सेटविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली.
तिसरा सेट अतिशय रंगतदार झाला. दोन्ही जोडय़ांनी आक्रमक खेळ केला. मात्र निना व ओक्साना यांनी सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला आणि हा सेट घेत सामना जिंकला.    

Story img Loader