भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी कॅरेबियन अष्टपैलू डीजे ब्राव्होने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट करून लोकांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. डीजे ब्राव्होने १० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १२ नंतर इन्स्टाग्रामवर किरॉन पोलार्डचा फोटो शेअर केला आहे. ‘हा खरोखरच दुःखाचा दिवस आहे. माझा जिवलग मित्र किरॉन पोलार्ड बेपत्ता आहे. मित्रांनो तुमच्याकडे काही माहिती असल्यास कृपया मला इनबॉक्स करा किंवा पोलिसांकडे तक्रार करा.” ब्रावोने त्याच्या कॅप्शनमध्ये दुःखी चेहऱ्याचा इमोजी देखील पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रावोच्या या पोस्टमुळे सर्वजण संभ्रमात पडले होते. सुरुवातीला लोकांना काही समजले नाही, पण व्यावस्थित पाहिल्यावर गुपित उघड झाले. वास्तविक, डीजे ब्रावोने किरॉन पोलार्डच्या फोटोवर लिहिले होते, ‘कीरॉन पोलार्ड, वय – ३४ वर्षे, उंची – १.८५ मीटर, शेवटचे पाहिले – चहलच्या खिशात, सापडल्यास कृपया वेस्ट इंडिजशी संपर्क साधा.’ डीजे ब्राव्हो किरॉन पोलार्डसोबत मस्करी करत आहे हे लोकांना समजायला वेळ लागला नाही. यानंतर या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. विशेष बाब म्हणजे ब्राव्होचा सर्वात चांगला मित्र जो ‘बेपत्ता’ असल्याचं सांगण्यात येत आहे, म्हणजेच पोलार्डनेही कमेंट केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, फिडेल एडवर्ड्स, वेस्ट इंडिजला दोनदा चॅम्पियन बनवणाऱ्या डॅरेन सॅमीसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. सॅमीने लिहिले की, ‘डीजे ब्राव्हो तू त्या बॉससाठी खूप चुकीचा आहेस.’ तर इतर अनेकांनीही खूप मजेदार कमेंट्स केल्या. ही पोस्ट शेअर करताना तुम्ही किती पेग्स लावलेत असा प्रश्न ब्राव्होला कोणीतरी ब्राव्होला विचारला. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, भारतात कोणीही गायब होऊ शकत नाही. याशिवाय इतरही अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात किरॉन पोलार्डने वेस्ट इंडिजची धुरा सांभाळली. त्या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता. तर दुखापतीमुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भाग घेऊ शकला नाही. तिसऱ्या वनडेतही तो खेळणार नाही. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने आधीच जिंकली आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bravo instagram post on kieron pollard missing viral on social media rmt