Bray Wyatt Death: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) स्टार ब्रे वॅटचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. WWE अधिकारी पॉल “ट्रिपल एच” लेवेस्क यांनी सोशल मीडियावर वॅटच्या मृत्यूची घोषणा केली. WWE सुपरस्टार आणि माजी हेवीवेट चॅम्पियन ब्रे वॅटने वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. वॅट, ज्याचे खरे नाव विंडहॅम रोटुंडा होते, जीवघेण्या आजारामुळे अनेक महिन्यांपासून तो खेळापासून लांब होता. त्याच्या मृत्यूची माहिती १४ वेळचा चॅम्पियन ट्रिपल एचने दिली. त्याच्या दुःखद निधनापूर्वी, अलीकडील अहवालांनी असा दावा केला होता की, तो WWEच्या रिंगमध्ये जवळपास परतणार होता. मात्र, त्याआधीच त्याचे निधन झाले.
WWE मध्ये ब्रे वॅट आणि द फिंड (the Fiend) या नावाने कुस्ती खेळणाऱ्या विंडहॅम रोटुंडा याचे निधन झाले आहे. त्याच्या अकाली निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. वॅटकाही काळापासून गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत होता, मात्र याबाबत काहीही खुलासा झाला नाही. आजारपणामुळे तो WWE आणि टेलिव्हिजनपासून दूर होता, मात्र आजचा मृत्यू अनपेक्षित आणि आकस्मिक असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. रोटुंडा हा तिसर्या पिढीतील कुस्तीपटू होता, माइक रोटुंडाचा मुलगा आणि ब्लॅकजॅक मुलिगनचा नातू. WWE मध्ये, तो वॅट कुटुंबाचा नेता म्हणून हा वारसा पुढे नेत होता.
ट्रिपल एचने ट्वीट केले
ट्रिपल एचने ब्रे वॅट याच्या निधनाबद्दल ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की, “WWE हॉल ऑफ फेमर माईक रोटुंडा याचा नुकताच एक कॉल आला, ज्याने आम्हाला दुःखद ही बातमी कळवली. तो म्हणाला, “आमच्या WWE कुटुंबातील आजीवन सदस्य, विंडहॅम रोटुंडा, ज्याला ब्रे वॅट म्हणून ओळखले जाते, त्याचे आज आकस्मित निधन झाले. आमचे विचार आणि सद्भावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, आम्ही विनंती करतो की प्रत्येकाने यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा.”
WWEच्या रिंगमध्ये तो पुन्हा परतणार होता
ब्रे वॅट रेसलमेनिया ३९ मध्ये भाग घेऊ शकला नाही. बॉबी लॅशलेसोबत झालेल्या हाय प्रोफाईल वादामुळे त्याला दूर ठेवण्यात आले होते. ऑगस्टच्या सुरुवातीला तो परतणार असल्याची अटकळ होती. परंतू, प्रकृती ठीक नसल्याने तो भाग घेऊ शकला नव्हता. तो बरा होत असल्याचे सांगण्यात येत होते मात्र, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
ब्रे वॅटची कारकीर्द कशी होती?
ब्रे वॅट दोन वेळा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन आणि एक वेळचा WWE चॅम्पियन राहिला आहे. त्याने मॅट हार्डीसोबत एकदा WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली आहे. त्याच वेळी, २०१९ मध्ये, वॅटची WWE पुरुष रेसलर ‘ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. मात्र, तो २०२१ आणि २०२२मध्ये WWEबरोबर नव्हता. त्याला एक वर्षासाठी सोडण्यात आले आणि या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रोटुंडा गेल्या सप्टेंबरमध्ये WWE मध्ये पुन्हा धूमधडाक्यात परतला, ज्यात विग्नेट्ससुद्धा सामील होती. त्याच्या पुनरागमनाने टेलिव्हिजन रेटिंग वाढवण्यास मदत केली.
रोटुंडा आणि त्याची माजी पत्नी सामंथा यांनी २०१२ मध्ये लग्न केले. त्याला दोन मुली आहेत. २०१७ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रोटुंडा आणि डब्ल्यूडब्ल्यूई रिंग अनाउन्सर जोजो एकत्र असल्याचे समोर आले होते. जोजोने २०१९ आणि २०२० साली दोन मुलांना जन्म दिला. जोजो आणि रोटुंडाचे गेल्या वर्षी लग्न झाले होते.