‘‘पाच वेळा विश्वविजेता असलेला ब्राझील व दोन वेळा अजिंक्यपद मिळविणाऱ्या अर्जेटिना यांना यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाची अधिक संधी आहे,’’ असे मत भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने सांगितले.
‘‘विश्वचषक स्पर्धा यंदा दक्षिण अमेरिकेत होत असल्यामुळे तेथील वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा आदी गोष्टी ब्राझील व अर्जेटिनासाठी अनुकूल आहेत. मात्र जर्मनी, स्पेन व उरुग्वे हे संघदेखील संभाव्य विजेते मानले जात आहेत. या पाच संघांच्या कामगिरीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे,’’ असेही छेत्री म्हणाला.
‘‘युरोपियन संघांनी त्यांच्या खंडाबाहेर झालेल्या स्पर्धामध्ये अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी केलेली नाही. युरोपात अनेक स्पर्धा होत असतात व त्यामध्येच या संघांचे वर्चस्व पाहावयास मिळते. मात्र, अन्य खंडांमध्ये झालेल्या स्पर्धामध्ये युरोपियन देशांचे खेळाडू अव्वल दर्जाचे कौशल्य दाखविण्यात अपयशी ठरले आहेत,’’ असेही तो पुढे म्हणाला.
आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेविषयी छेत्री म्हणाला, ‘‘आमच्या तयारीवरच संघाची कामगिरी अवलंबून आहे. आम्हाला तीन महिने शिबिरात सराव करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा आम्हाला घेता येईल. आमच्या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा समावेश असल्यामुळे संघ अतिशय समतोल आहे.’’