नेयमार आपल्या शानदार खेळाची चुणूक दाखवल्याने फुटबॉलरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यामुळेच ब्राझीलने मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात पोर्तुगालचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. २०१४चा विश्वचषक आता वर्षभराच्या अंतरावर येऊन ठेपला आहे आणि यजमान ब्राझीलच्या संघाला नेयमाररूपी नवा तारा मिळाला आहे.
ब्राझील-पोर्तुगाल यांच्यातील हा सामना जरी मैत्रीपूर्ण असला तरी परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील अस्सल लढतीची रंगत क्रीडाशौकिनांना पाहायला मिळाली. लुइस फेलिप स्कोलारी आणि पावलो बेन्टो या प्रशिक्षकांनी आपले सर्वोत्तम संघ खेळवून या लढतीमधील आनंद द्विगुणित केला. पोर्तुगालचा संघ ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय मैदानावर उतरला. परंतु नेयमारने फुटबॉलरसिकांना अजिबात निराश केले नाही आणि संघाच्या तिन्ही गोलमध्ये आपला सहभाग नोंदवला.
पोर्तुगालच्या राऊ मेरीलीसने १८व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले.
परंतु त्यानंतर फक्त सहा मिनिटांनी थियागो सिल्व्हाने ब्राझीलसाठी पहिला गोल नोंदवला. मग नेयमारने ३४व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल करून मध्यंतराला ब्राझीलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जो याने ४९व्या मिनिटाला तिसऱ्या गोलची नोंद केली.

ब्राझील                            पोर्तुगाल
३                                     १
थियागो सिल्व्हा २४         राऊ मेरीलीस १८
नेयमार ३४
जो ४९

Story img Loader