जगातील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला स्पेन संघ.. समोर युवा आणि अननुभवी खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा असलेला पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकणारा ब्राझील.. पासिंगचा सुरेख मिलाफ असलेल्या स्पेनच्या शिलेदारांना रोखून अतिशय प्रभावी आणि आश्वासक फुटबॉलचे प्रदर्शन करणाऱ्या ब्राझीलने विश्वविजेत्यांना ३-० असे नामोहरम केले आणि कॉन्फेडरेशन चषकावर सलग तिसऱ्यांदा मोहोर उमटवली. दोन गोल झळकावणारा फ्रेड आणि एक गोल लगावणारा नेयमार ब्राझीलच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सुसाट वेगाने खेळ करणाऱ्या ‘फ्रेडेक्स’ने स्पर्धेत पाच गोल लगावत छाप पाडली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर वर्चस्व गाजवणाऱ्या स्पेनला चारीमुंडय़ा चीत करून ब्राझीलने चौथ्यांदा कॉन्फेडरेशन चषकावर नाव कोरले. या विजयासह यजमान ब्राझीलने २०१४मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी आपण प्रबळ दावेदार आहोत, हा संदेश फुटबॉलजगताला दिला आहे.
ब्राझीलने स्पेनसाठी अचूक रणनीती आखली आहे, हे दुसऱ्या मिनिटालाच स्पष्ट झाले. हल्कने उजव्या कॉर्नरवरून दिलेल्या पासवर चेंडूवर ताबा मिळवताना स्पेनचे दोन बचावपटू गोलरक्षक आयकर कॅसिल्लास तसेच नेयमार आणि फ्रेड यांच्यात चढाओढ रंगली. गोलजाळ्याच्या समोर दोन मीटर अंतरावर चेंडूवर ताबा मिळवताना फ्रेड खाली पडला. चेंडूवर झडप घालण्यासाठी कॅसिल्लासने झेप घेतली. इतक्यात फ्रेडने खाली पडूनच चेंडूला किक मारली. चेंडू कॅसिल्लासच्या डोक्यावरून थेट गोलजाळ्यात विसावला. त्यानंतर ऐतिहासिक माराकाना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ७८,००० चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. ‘विश्वविजेते परत आलेत,’ अशा घोषणांनी स्टेडिमम दणाणले.
४४व्या मिनिटाला नेयमारने ड्रिब्लिंगचे सुरेख कौशल्य दाखवत स्पेनच्या तीन बचावपटूंना चकवून गोलक्षेत्रात आगेकूच केली. त्याने चेंडू ऑस्करकडे सोपवला. सर्वाच्या पुढे असल्यामुळे ‘ऑफ साइड’ होऊ नये, यासाठी नेयमार काही पावले मागे आला. त्याच वेळी ऑस्करने पुन्हा चेंडू नेयमारकडे तटवला. डाव्या बाजूने पुढे सरकून नेयमारने डाव्या पायाने मारलेला जोरदार फटका कॅसिल्लासला भेदून गोलजाळ्यात गेला. पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी घेतल्यामुळे ब्राझीलचा विजय जवळपास निश्चित झाला होती. स्पेनने अनेक चाली रचल्या, पण गोल झळकावण्यात त्यांना अपयश आले. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला फ्रेडने दुसरा गोल लगावला. उजव्या बाजूने हल्कने दिलेल्या पासवर फ्रेडने मारलेला फटका गोलजाळ्याच्या खांबाला लागून आत गेला. ब्राझीलने ३-० अशी आघाडी कायम ठेवत चषकावर कब्जा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा