कर्णधार नेयमार याच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ब्राझील संघाने व्हेनेझुएलावर २-१ असा विजय साजरा करून कोपा अमेरिका स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. थिएगो सिल्वा आणि रॉबेटरे फिरमिनो यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर ब्राझीलने ‘क’ गटातून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. व्हेनेझुएलासाठी निकोलस फेडोर याने एकमेव गोल केला.
पेरूने गत आठवडय़ात व्हेनेझुएलावर विजय साजरा करून ‘क’ गटात  उपांत्यपूर्व फेरीसाठी चुरस निर्माण केली होती. पेरूच्या विजयाने चारही संघांच्या खात्यात प्रत्येकी ३ गुण होते आणि अखेरच्या साखळी सामन्यांत प्रत्येकाला विजय मिळवणे क्रमप्राप्त होते. त्यामुळेच या लढतीतील महत्व अधिक वाढले. सामन्याच्या ९व्या मिनिटाला रॉबिन्होच्या पासवर व्हॉलीद्वारे अप्रतिम गोल करून सिल्वाने ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर सिल्वाने सीमारेषेबाहेर बसलेल्या नेयमारकडे पाहून आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
मध्यंतरानंतर ५१व्या मिनिटाला रॉबेटरेने ब्राझीलसाठी दुसरा गोल करून आघाडी २-० अशी मजबूत केली. सांघिक खेळाचा नजराणा पेश करताना ब्राझीलने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला, परंतु ८४व्या मिनिटाला फेडोरने व्हेनेझुएलासाठी एकमेव गोल केला. हा गोल पराभव टाळण्यासाठी पुरेसा ठरला नाही. ‘‘संलग्न संघ म्हणून आम्ही खेळलो आणि हेच आजच्या यशाचे गमक ठरले,’’ अशी प्रतिक्रिया सिल्वाने सामन्यानंतर दिली. तो म्हणाला, ‘‘ फुटबॉल सांघिक एकजुटीने खेळायला हवा. वैयक्तिक विचार केल्यास, खेळावरील लक्ष्य विचलित होते. नेयमार संघात नसला तरी त्याच्यासाठी आम्ही खेळलो.’’
ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पेरुग्वे संघाशी सामना करावा लागेल. याविषयी सिल्वा म्हणाला,‘‘ही लढत आव्हानात्मक असेल. येथील प्रत्येक संघ तुल्यबळ आहे. गतवर्षी पेरुग्वेने अंतिम फेरीत धडक मारली होती आणि उपांत्यपूर्व फेरीत आम्हालाही पराभूत केले होते. त्यामुळे त्यांना नमवणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.’’
दुसऱ्या लढतीत कोलंबिया आणि पेरू यांच्यातील सामना गोलशून्य राहिल्याने पेरूने उपांत्यपूर्व फेरीत सहज स्थान पक्के केले. कोलंबियाने तिसऱ्या स्थानावर विराजमान होऊनही आगेकूच केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत
त्यांना अर्जेटिनाशी सामना करावा लागेल, तर चिली विरुद्ध उरुग्वे आणि बोलिव्हिया विरुद्ध पेरू अशा लढती रंगणार आहेत.

Story img Loader