कोठेही तंबू ठोकल्यानंतर तो दीर्घकाळ टिकावा, याकरिता किमान तीन व तेही मजबूत खांब असावे लागतात. जर एकखांबी तंबू असेल तर तो कोसळण्यास फार वेळ लागत नाही. फुटबॉलमध्येही असेच आहे. हा खेळ सांघिक असल्यामुळे अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी संघातील सर्वच खांब भक्कम असावे लागतात. एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर विजेतेपद मिळविता येत नाही. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत हेच सत्य अधोरेखित होते आहे.
जे जे संघ केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहिले, त्या त्या संघांची वाताहत झाली. जर्मनी व अर्जेटिनाचा अपवाद वगळता यजमान ब्राझीलसह सर्वच सहभागी संघांची एकखांबी तंबू ढासळल्यासारखीच अवस्था झाली. प्रत्येक संघात सामना जिंकून देणारा खेळाडू असतो, परंतु त्याने एकटय़ानेच लढावे आम्ही पाठीशी आहोत, वृत्ती अन्य सहकाऱ्यांकडे असेल तर त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंनी ‘भरवशाच्या म्हशीला..’ अशीच निराशाजनक कामगिरी केली व आपल्या संघावर लाजिरवाणा पराभव ओढवून घेतला.
नेयमार व सिल्वा या दोन श्रेष्ठ खेळाडूंवर ब्राझीलचे सर्वस्व अवलंबून होते. जर विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांच्यासारखे खेळाडू संघात नसतील तर भारतीय क्रिकेट संघाची दयनीय अवस्था होते, तसेच चित्र ब्राझीलबाबत पाहायला मिळाले. उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात नेयमार हा जखमी झाला. सिल्वावर एक सामन्याची बंदी होती. साहजिकच जर्मनीसारख्या तुल्यबळ संघाविरुद्धच्या सामन्यात हे दोन्ही आघाडीचे खेळाडू नसल्यामुळे सामन्यापूर्वीच ब्राझीलच्या खेळाडूंची मानसिक हार झाली होती. त्यातच सहा मिनिटांत चार गोलांचा धडाका जर्मनीने केल्यामुळे ब्राझीलची अवस्था शरीरातील प्राणवायू संपल्यासारखीच झाली होती. त्यामुळेच की काय, या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मानहानिकारक पराभव ब्राझील संघाला पत्करावा लागला आणि तेही घरच्या मैदानावर व हजारो चाहत्यांच्या साक्षीने.
अर्जेटिना संघाला पेनल्टी शूटआऊटने तारले व अंतिम फेरीत नेले, अन्यथा त्यांनाही उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले असते. या सामन्यात त्यांचा हुकमी खेळाडू लिओनेल मेस्सी याला नेदरलँड्सच्या खेळाडूंनी गोल करण्याची फारशी संधी दिली नव्हती. अर्जेटिनाची मुख्य मदार मेस्सीवर आहे, हे ओळखूनच नेदरलँड्सच्या खेळाडूंनी त्याच्याकडे चेंडू फारसा जाणार नाही, असाच प्रयत्न केला. विजेतेपद मिळविण्यासाठी अर्जेटिनाला केवळ मेस्सीवर अवलंबून राहणे चुकीचे होईल. नेदरलँड्सची भिस्त आर्येन रॉबेन याच्यावर आहे, हे ओळखून अर्जेटिनाच्या खेळाडूंनी त्याच्या चाली कशा रोखता येतील, असेच डावपेच खेळले व त्यामध्ये ते यशस्वी झाले.
मारिओ बालोटेली व स्टीफन अल शारावी हे इटलीसाठी आधारस्तंभ होते. मात्र या स्पर्धेत त्यांची डाळ शिजली नाही. या खेळाडूंकडे चेंडू जाणार नाही, याची काळजी त्यांच्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी घेतली. सांघिक समन्वयाअभावी इटलीला खराब कामगिरीला सामोरे जावे लागले. स्पेनकडे आंद्रेस इनिएस्टा, डेव्हिड व्हिला यांच्यासारखे अनुभवी खेळाडू होते. त्यांचा गोलरक्षक कॅसिला म्हणजे पोलादी भिंतच मानली जात होती. मात्र साखळी सामन्यातील पहिल्याच लढतीत त्याच्या खराब कामगिरीमुळे नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी पाच गोल स्वीकारले. या पराभवामुळे गतप्राण झालेला स्पेनचा संघ मानसिकदृष्टय़ा सावरूच शकला नाही.
वेन रुनी, स्टीव्हन गेरार्ड यांचा समावेश असलेला इंग्लंडचा संघ उपांत्यपूर्व फेरीत सहज स्थान मिळविल अशी अपेक्षा होती. मात्र या दोन्ही खेळाडूंची जादू ब्राझीलमध्ये चालली नाही व साखळी गटातच त्यांचे आव्हान संपले. पोर्तुगालची स्थितीसुद्धा काही वेगळी नव्हती. ख्रिस्तियानो रोनाल्डो या महागडय़ा खेळाडूच्या जिवावर जगज्जेतेपदाचे स्वप्न पाहात होते. मात्र रोनाल्डो हा सपशेल अपयशी ठरला व संघाचे आव्हान बाद फेरीपूर्वीच संपले. केविन डी ब्रुने (बेल्जियम), ज्युलियन ग्रीन (अमेरिका), इनेर व्हॅलेंसिया (इक्वेडोर), जेम्स रॉड्रिगेझ (कोलंबिया) आदी खेळाडूंबाबतही खूप चर्चा होती. मात्र हे भरवशाचे खेळाडू ऐनवेळी गोल करण्यात अपयशी ठरले व त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहणाऱ्या त्यांच्या संघांचेही पानिपत झाले. फुटबॉल हा केवळ एकटय़ादुकटय़ाने खेळावयाचा क्रीडाप्रकार नसून येथे सांघिक कौशल्यच महत्त्वाचे असते, हे पुन्हा या स्पर्धेत सिद्ध आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा