फुटबॉल विश्वातील सर्वकालीक महान फुटबॉलपटू पेले याचं ८२व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची थेट मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पेलेंच्या निधनानंतर जगभरातील फुटबॉलप्रेमींसह अनेक फुटबॉलपटू शोक्य व्यक्त करत आहेत. पेलेंच्या निधनामुळे फुटबॉलमधील सुवर्णयुगाचा अस्त झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. मात्र, अवघ्या जगाला वेड लावणाऱ्या या सर्वकालीक महान फुटबॉलपटूला कधीच युरोपियन फुटबॉल क्लबकडून फुटबॉल खेळता आला नाही. याला कारण ब्राझीलचं प्रशासन आणि पेलेंचं ब्राझील प्रेम ठरलं.
१९५६ साली पेले सर्वप्रथम सँटोस क्लबशी जोडले गेले होते. तिथूनच पेले यांच्या अद्भुत कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तेव्हापासून पेले यांनी खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्यांनी नवनवे विक्रम प्रस्थापित केले. सँटोससाठी पेले यांनी ९ फुटबॉल लीग स्पर्धा जिंकल्या.
दुःखद बातमी ! ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी कॅन्सरने निधन
पेलेंना सुरुवातीला पचवावे लागले नकार
पेले यांचं खरं नाव एडसन अरांतेस डो नासिमेंटो होतं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये साओ पावलो राज्यातल्या बौरूमधे त्यांनी अनेक छोट्या लीग स्पर्धा खेळल्या आणि आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. पण त्यानंतरही त्यांना शहरातल्या अनेक नामवंत क्लब संघांनी नकारच दिला होता. त्यामुळे अवघ्या जगाला वेड लावणाऱ्या या महान फुटबॉलपटूला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अनेक नकार पचवावे लागले होते. त्यानंतर मात्र पेले यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!
‘ब्लॅक पर्ल’ ते ब्राझीलची ‘राष्ट्रीय संपत्ती’!
जगभरातल्या चाहत्यांना वेड लावणाऱ्या पेलेंना व्यावसायिक फुटबॉलपटू असूनही ब्राझीलच्या बाहेरच्या क्लबकडून फुटबॉल खेळता आलं नाही. याला कारण ब्राझील सरकार आणि पेलेंचं ब्राझीलप्रेम होतं. यशाच्या शिखरावर असणाऱ्या पेलेंना युरोपातील अनेक प्रसिद्ध फुटबॉल क्लबकडून खेळण्याचे प्रस्ताव आले. पण त्यांनी ते फेटाळून लावले. त्यांनी ब्राझीलच्या बाहेर न जाता देशातच राहावे, यासाठी ब्राझील सरकारचा उघड दबाव होता. आजच्याप्रमाणे त्या काळात खेळाडूंना क्लब निवडण्याचं स्वातंत्र नसल्यामुळे पेलेंना ब्राझीलमध्येच राहणं भाग होतं. पण त्याहीपुढे जाऊन ब्राझील सरकारनं त्यांना थेट ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून जाहीर केलं. पेलेंना ‘ब्लॅक पर्ल’ ही उपाधीही ब्राझीलनंच दिली होती. पेलेंची कारकिर्द ब्राझीलमध्येच बहरल्यामुळे त्यांची नैसर्गिक शैली खऱ्या अर्थाने कायम राहिली असं म्हटलं जातं. अर्थात, कारकिर्जीच्या शेवटच्या काळात म्हणजे १९७५ मध्ये पेले ‘न्यूयॉर्क कॉसमॉस’ या एकमेव परदेशी क्लबकडून खेळले होते.