डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांसाठी देशवासीयांना करावा लागणारा संघर्ष, हिंसाचार, या साऱ्या नकारात्मक घटनांची फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने चर्चा होत आहे. मात्र हे असे असले तरी हा विश्वचषक सगळ्यात हरित-पर्यावरणस्नेही करण्याचा निर्धार संयोजकांनी केला आहे. हरितगृह उत्सर्जकांचे प्रमाण कमी करण्याला प्राधान्य देण्याचे प्रयत्न तसेच हरित पारपत्र अशा योजना राबवल्या जाणार आहेत.
आम्हाला हरित विश्वचषक करायचा आहे, अशा शब्दांत ब्राझीलचे पर्यावरणमंत्री इझाबेला टेइखेअरा यांनी सांगितले. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये ओझोन वायूला धोका पोहोचेल, अशा कार्बनरूपी वायूंचे उत्सर्जन मोठय़ा प्रमाणावर होते. स्टेडियमची उभारणी, संघांचे आगमन-निर्गमन, सामन्यांचे आयोजन या सगळ्यातून कार्बन डायऑक्साइडची निर्मित्ती होते. ब्राझीलमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये ५९,००० टन कार्बन वातावरणात सोडला जाणार आहे. अप्रत्यक्ष वायूंचा यामध्ये समावेश केला तर १.४ दशलक्ष टन कार्बन वातावरणात सोडला जाणार आहे. लंडन ऑलिम्पिक दरम्यान कार्बन उत्सर्जकांच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याने कमी
आहे.