ब्राझील संघाचा अविभाज्य भाग असलेल्या नेयमारवरील चार सामन्यांच्या बंदीच्या शिक्षेविरोधात दाद मागणार असल्याचे संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले. कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात हाणामारीकरिता कारणीभूत ठरल्याबद्दल तसेच पंचांना शिवीगाळ केल्याबद्दल नेयमारवर चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने घेतला. बंदीच्या शिक्षेसह त्याला दहा हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला.
‘‘ब्राझीलसाठी नेयमार महत्त्वाचा खेळाडू आहे. चार सामन्यांची बंदी ही मोठी शिक्षा आहे. आम्हाला झुकते माप नको आहे. त्याच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा एवढाच आमचा प्रयत्न आहे,’’ असे ब्राझीलचे प्रशिक्षक डुंगा यांनी सांगितले.
दरम्यान, नेयमारचे कृत्य गंभीर असल्याने त्याला चार सामने खेळता येणार नाहीत, असे दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे. नेयमारऐवजी बदली खेळाडूची ब्राझीलने घोषणा केलेली नाही. मात्र फिलिपे कौटिन्होला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader