प्रत्येक सामन्यामध्ये एकाच व्यूहरचनेने आणि रणनीतीने खेळण्यात काहीच अर्थ नसतो. कारण प्रतिस्पर्धी तुमच्यावर काटेकोर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी खेळामध्ये बदल करत प्रतिस्पध्र्याना थांग लागू द्यायचा नसतो आणि हेच ब्राझीलने कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यामध्ये दाखवून दिले. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये ब्राझील चेंडूला जमिनीवर ठेवत होती. चेंडू बचावफळीकडून मधल्या फळीत यायचा आणि तिथून आक्रमण फळीमध्ये जायचा. पण या सामन्यात ब्राझीलने ‘हवाई हल्ले’ चढवले आणि हेच त्यांच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. या सामन्यामध्ये बचावपटूंकडून चेंडू थेट ‘टार्गेट लाइन’वर जाताना दिसला. यामध्ये मधल्याफळीची भूमिका कमी होती. कारण बचावपटूंकडून चेंडू आक्रमणपटूकडे गेल्याने त्यांचा वेळही वाचत होता आणि जलद आक्रमणेही लगावता येत होती आणि याचाच नेयमारने चांगला फायदा उचलला. नेयमार हा गोल बनवणारा फुटबॉलपटू आहे आणि या सामन्यात त्याने तेच केले. नेयमार चांगल्या फॉर्मात असणे, हे ब्राझीलच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पण याच रणनीतीने ब्राझील यापुढेही खेळणार की तिसरी रणनीती आखणार, याची उत्सुकता असेल.
ब्राझीलने या सामन्यात जोरदार आक्रमणे लगावली असली तरी त्यांचा बचाव मात्र चांगला झाला नाही. कारण ब्राझीलने पहिला गोल लगावल्यावर कॅमेरूनने त्याची लगेच परतफेड केली. त्यामुळे ब्राझीलला बचावाबाबत नक्कीच विचार करावा लागेल. कारण कॅमेरून हा काही दादा संघ नक्कीच नव्हता. पण पुढे जाऊन ब्राझीलची गाठ जर्मनी किंवा नेदरलँड्ससारख्या मोठय़ा संघांशी पडू शकते आणि त्यावेळी त्यांचा बचाव असाच राहिला तर त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.
नेदरलँड्सचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. चिलीविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. पण खरे तर या सामन्यात चिलीचा विजय व्हायला हवा होता. तुम्ही आकडेवारीवर नजर टाकली तरी ते स्पष्ट होईलच. पण नेदरलँड्सने शिताफीने सामन्यावर कब्जा केला. रॉबिन व्हॅन पर्सी हा त्यांचा नायक, दोन पिवळी कार्ड्स मिळाल्याने त्याला सामन्यात खेळता आले नसले तरी आर्येन रॉबेनने दमदार कामगिरी केली. रॉबेनचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण तो ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाची बचाव फळी भेदतो, एका वेळेला २-३ खेळाडूंना सहजपणे चकवत तो गोलसाठी जागा निर्माण करतो, तो ज्या वेगाने चेंडू घेऊन जातो, हे सारे प्रेक्षणीय असते. चिलीविरुद्धच्या लढतीचा तोच खऱ्या अर्थाने सामनावीर होता. कारण त्याने गोल केला नसला तरी त्यासाठीचा पाया त्यानेच रचलेला होता. आक्रमणामध्ये नेदरलँड्सचा संघ हा अप्रतिम कामगिरी करताना दिसत असला तरी त्यांचा बचाव चांगल्या स्थितीमध्ये दिसत नाही. कारण गेल्या सामन्यात चिलीने त्यांच्यावर चांगले आक्रमण केले होते, पण दैव बलवत्तर म्हणून नेदरलँड्सवर गोल झाले नाहीत. पण आता बाद फेरीत पोहोचल्यावर त्यांनी बचावावर मेहनत घ्यायला हवी.
मेक्सिको आणि क्रोएशिया यांच्यातील सामना हवा तसा रंगला नाही. कारण क्रोएशियाने ब्राझीलविरुद्धच्या सामन्यामध्ये जसा खेळ केला होता, त्यामध्ये त्यांना सातत्य राखता आलेले नाही. पण मेक्सिकोचा संघ मात्र सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. संघामध्ये जास्तीत जास्त युवा खेळाडू आहेत आणि ते प्रत्येक सामन्यामध्ये जोरदार प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी जर असाच खेळ कायम ठेवला तर ते मोठय़ा संघालाही भारी पडू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळताना कोणीही गाफील राहून चालणार नाही.

Story img Loader