कॉन्फेडरेशन चषक आणि आगामी फिफा विश्वचषकाच्या आयोजनाला मोठय़ा प्रमाणावर विरोध अशा नकारात्मक परिस्थितीतही ब्राझीलने शनिवारी इटलीवर ४-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला. कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने दिमाखदार विजयासह ‘अ’ गटात अव्वल स्थान राखले आहे. या विजयामुळे ब्राझीलने उपांत्य फेरीत स्पेनविरुद्धचा सामना टाळला आहे.
विश्वचषकाच्या आयोजनामुळे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा पडणार आहे, हे लक्षात घेऊन लाखो ब्राझीलचे नागरिक रस्त्यावर उतरले. या निषेधाचे सावट कॉन्फेडरेशन चषकाच्या सामन्यांवरही आहे. मात्र त्याही परिस्थितीत ‘अ’ गटाच्या तीनपैकी तीन लढतींत विजय मिळवत ब्राझीलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. उपांत्य फेरीत ब्राझीलची लढत उरुग्वेशी होण्याची शक्यता आहे. ब्राझीलविरुद्ध पराभवामुळे इटलीला उपांत्य फेरीत विजयासाठी विश्वविजेत्या स्पेनशी मुकाबला करावा लागण्याची शक्यता आहे.
पहिल्या सत्रात गोलसाठी जोरदार मुकाबला पाहायला मिळाला. नेयमारने गोल करण्याची एक संधी वाया घालवली. इटलीने बचाव अभेद्य करत पहिल्या सत्रात ब्राझीलला गोल करण्यापासून रोखले. मात्र मध्यंतरानंतर लगेचच नेयमारची फ्री-किक रोखण्याचा इटलीच्या गिगी बफेने प्रयत्न केला, मात्र ब्राझीलच्या डांटेने चेंडूवर झटपट ताबा मिळवत शानदार गोल केला.
सहा मिनिटांनंतर इटलीतर्फे मारियो बालोटेलीने शिताफीने चेंडू इमॅन्युअल गिआचेरिनीकडे सोपवला. बालोटेलीचा विश्वास सार्थ ठरवत गिआचेरिनीने इटलीतर्फे पहिला गोल केला. इटलीला आघाडीपटू आंद्रेआ पिलरेची उणीव जाणवली.
स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नेयमारने फ्री-किकच्या आधारे गोल केला. यानंतर दहा मिनिटांत मार्सेलोने फ्रेडकडे चेंडू सोपवला. डाव्या पायाने जोरदार गोल करत फ्रेडने ब्राझीलची आघाडी ३-१ अशी बळकट केली. बालोटेलीच्या मदतीच्या साह्य़ाने जिओरजिओ चिइलिनीने इटलीतर्फे सुरेख गोल केला. सामना संपायला मिनिटभरापूर्वी फ्रेडने आणखी एक गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मेक्सिकोच्या विजयात हर्नाडीझ चमकला
बेलो होरिझोन्टे : झेव्हियर हर्नाडीझच्या दोन शानदार गोलच्या जोरावर मेक्सिकोने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत जपानवर २-१ असा विजय मिळवला. स्पर्धेतला पहिला विजय मिळवूनही मेक्सिकोला उपांत्य फेरीत जाता येणार नाही. ब्राझील आणि इटली यांनी याआधीच उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा