संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-० अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटिनानं हा किताब आपल्या नावे केला होता. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनानं १५ वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली जाईल, असं बोललं जात होतं. अंदाजाप्रमाणे मैदानात दोन्ही संघांकडून कडवा प्रतिकार बघायला मिळाला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून तोडूस तोड प्रतिकार केला जात असल्यानं कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आलं नाही. पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.

पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात झालेल्या लढतीत अर्जेंटिनाने ब्राझीलला पराभव करत किताबावर नाव कोरलं. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात संघानं पहिल्यांदाच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे. मेस्सीनं जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता. कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयामुळं त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. दुसरीकडे २०१९ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला. असं असलं तरी फुटबॉल प्रेमींसाठी यंदाचा कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामना खास होता. अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकमेकांविरोधात खेळताना फुटबॉल चाहत्यांना बघायला मिळाले. या सामन्यात मेस्सी आणि नेमार हे २ फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानावर उतरले होते.

यापूर्वी १९९३ साली अर्जेंटिनानं ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनानं मेक्सिकोचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazil vs argentina copa america 2021 final argentina beat brazil won 15th copa america trophy bmh