वृत्तसंस्था, दोहा : कलात्मक आणि आक्रमक खेळाने सर्वाना थक्क केलेल्या ब्राझीलच्या संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे ध्येय असून शुक्रवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत त्यांच्यापुढे गतउपविजेत्या क्रोएशियाचे आव्हान असेल. एज्युकेशन सिटी स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्राझीलचे पारडे जड मानले जात आहे. तसेच या सामन्यात ब्राझीलचा नेयमार आणि क्रोएशियाचा लुका मॉड्रिच यांच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल.
प्रशिक्षक टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्राझीलने यंदाच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. ब्राझीलने साखळी फेरीत सर्बिया आणि स्वित्झर्लंड या संघांना पराभूत करत बाद फेरीतील स्थान निश्चित केले होते. त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना कॅमेरुनकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यासाठी प्रमुख खेळाडूंचे ब्राझीलच्या संघात पुनरागमन झाले. नेयमार, व्हिनिशियस आणि रिचार्लिसन यांसारख्या आघाडीपटूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर ब्राझीलने कोरियाला ४-१ असे नमवले. आता क्रोएशियाविरुद्ध हीच लय कायम राखण्याचा ब्राझीलचा प्रयत्न असेल. ब्राझीलला कर्णधार व अनुभवी बचावपटू थिआगो सिल्वा, मध्यरक्षक कॅसेमिरोकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, क्रोएशियाला यंदाच्या स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ करता आलेला नाही. साखळी फेरीत क्रोएशियाला मोरोक्को आणि बेल्जियमविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांनी कॅनडावर ४-१ अशी मात केली. बाद फेरी गाठण्यासाठी क्रोएशियाला हे निकाल पुरेसे ठरले. उपउपांत्यपूर्व फेरीतही विजयासाठी क्रोएशियाला झुंजावे लागले. नियमित वेळ आणि अतिरिक्त वेळेअंती जपानने क्रोएशियाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाला ३-१ असा विजय मिळवण्यात यश आले. परंतु आता ब्राझीलला नमवायचे झाल्यास क्रोएशियाला खेळात बरीच सुधारणा करावी लागणार आहे. विशेषत: मॉड्रिच, माटेओ कोव्हाचिच आणि मार्सेलो ब्रोझोव्हिच या मध्यरक्षकांनी आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे. गेल्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू मॉड्रिचला यंदा छाप पाडता आलेली नाही. असे असतानाही ब्राझीलला त्याच्यापासून सावध राहावे लागेल. आक्रमणाची जबाबदारी इव्हान पेरेसिच आणि आंद्रे क्रॅमरिच यांच्यावर असेल.
संभाव्य संघ
७ क्रोएशिया : डॉमिनिक लिव्हाकोव्हिच; जोसिप जुरानोव्हिच, डेयान लोव्हरेन, जास्को ग्वार्डियोल, बोर्ना बारिसिच; लुका मॉड्रिच, मार्सेलो ब्रोझोव्हिच, माटेओ कोव्हाचिच; आंद्रे क्रॅमरिच, ब्रूनो पेटकोव्हिच, इव्हान पेरेसिच
- संघाची रचना : (४-३-३)
७ ब्राझील : अॅलिसन; एडर मिलिटाओ, मार्किन्यॉस, थिआगो सिल्वा, डॅनिलो; लुकास पाकेटा, कॅसेमिरो; राफिन्हा, नेयमार, व्हिनिशियस ज्युनियर; रिचार्लिसन
- संघाची रचना : (४-२-३-१)
- वेळ : रात्री ८.३० वाजता
- थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्ट्स १८-खेल, जिओ सिनेमा