दोहा : पाच वेळा जेतेपद मिळवणाऱ्या ब्राझीलचा सामना सोमवारी उपउपांत्यपूर्व सामन्यात दक्षिण कोरियाशी होणार आहे. त्या वेळी आशिया संघासमोर ब्राझीलचे पारडेच जड दिसत आहे.ब्राझीलने आपल्या पहिल्या दोन साखळी सामन्यांत विजय मिळवत पुढच्या फेरीतील आपली जागा निश्चित केली.अखेरच्या सामन्यात त्यांना कॅमेरूनकडून ०-१ अशी हार पत्करावी लागली.
ब्राझीलने या सामन्यात आपली दुसरी फळी मैदानात उतरवली होती. पराभूत होऊनही चांगल्या गोल फरकामुळे ब्राझीलचा संघ ग-गटात अव्वल स्थानी राहिला. ब्राझील संघात कोरियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतीतून सावरत असलेल्या नेयमारच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या सामन्यात संघ पूर्ण तयारीनिशी व सर्व प्रमुख खेळाडूंसह मैदानात उतरेल. ब्राझीलकडे कॅसेमिरो, राफिन्हा, रिचार्लिसन, व्हिनिशियससारखे खेळाडू असून प्रतिस्पर्धी संघावर आक्रमक करण्यास ते सक्षम आहेत.
दुसरीकडे, दक्षिण कोरियाच्या संघाने २०१०नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी पोर्तुगालवर मिळवलेल्या २-१ अशा विजयामुळे ते शक्य झाले. त्यामुळे त्यांनी ह-गटात दुसऱ्या स्थानावर राहत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले. कोरियाच्या संघाने या स्पर्धेत चांगला खेळ केला. मात्र, ब्राझीलविरुद्धची त्यांची आजवरची कामगिरी निराशाजनक आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण: मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडेल अशी क्षमता फ्रान्सच्या किलियन एम्बापेमध्ये आहे का?
दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सात वेळा खेळले असून हे सर्व मैत्रीपूर्ण सामने होते. यामध्ये ब्राझीलने सहा सामन्यांत विजय मिळवले असून कोरियाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे ब्राझीलविरुद्ध सामना जिंकायचा झाल्यास त्यांना सर्व आघाडय़ांवर चमकदार कामगिरी करावी लागेल. कोरियाची मदार त्यांचा तारांकित खेळाडू सोन ह्युंग मिनवर असेल.
’ वेळ : मध्यरात्री १२.३० वा.