ब्राझीलचा जपानवर ३-०ने दणदणीत विजय
कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धा
ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर यजमान ब्राझीलने जपानचा ३-० असा पराभव करून कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने शानदार सुरुवात केली. ब्राझीलचा युवा फुटबॉलपटू नेयमारच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते, पण तिसऱ्या मिनिटालाच नेयमारने अप्रतिम गोल करून ‘अपना जादू चल गया’ हे दाखवून दिले.
नेयमार, पॉलिन्हो आणि जो यांनी केलेल्या गोलांच्या बळावर ब्राझीलने जपानवर सरशी साधली. या विजयासह ब्राझीलने जपानविरुद्धची विजयाची मालिका कायम राखली. प्रशिक्षक लुईस फिलिप स्कोलारी यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ब्राझीलच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण भक्कम बचाव आणि आक्रमण, असा सुरेख मिलाफ साधत ब्राझीलने आपण पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकाचे प्रमुख दावेदार आहोत, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले.
डाव्या कॉर्नरवरून मार्सेलोकडून मिळालेल्या क्रॉसवर नेयमारने तिसऱ्या मिनिटाला चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. या गोलनंतर जपानने चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कैसुके होन्डा याने फ्री-किकवर मारलेला फटका ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसार याने रोखला. उजव्या कॉर्नरवरून दानी अल्वेसने दिलेल्या क्रॉसवर पॉलिन्होने चेंडूवर नियंत्रण साधले आणि जपानचा गोलरक्षक ईजी कावाशिमा याला चकवून ४८व्या मिनिटाला दुसरा गोल केला. सामना संपायला काही सेकंदाचा खेळ शिल्लकअसताना जो याने तिसऱ्या गोलाची भर घातली.
* दुबळ्या संघांमध्ये चुरस
बेलो होरिझेन्टो : कॉन्फेडरेशन चषकाच्या लढतीत दुबळ्या ताहिती संघाविरुद्ध नायजेरियाचे पारडे जड मानले जात आहे. गेल्या १७ सामन्यांत अपराजित राहिलेला ‘सुपर ईगल्स’ नायजेरिया संघ जागतिक क्रमवारीत १३८व्या स्थानी असलेल्या ताहितीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी सज्ज आहे. २ लाख ७० हजार लोकसंख्या असलेल्या आणि ओशियाना नेशन्स स्पर्धा जिंकून या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ताहितीला प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये खेळण्याचा अनुभव नाही. पण नायजेरियासारख्या आपल्यापेक्षा बलाढय़ संघाला कडवी लढत देण्यासाठी ते उत्सुक आहेत. ‘‘एक हौशी खेळाडू या नात्याने, जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंविरुद्ध खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी आम्ही कसून सराव केला आहे,’’ असे ताहितीचा आघाडीवीर ईफे अ‍ॅम्बोस याने सांगितले.
सामना : नायजेरिया वि. ताहिती
वेळ : रात्री १२.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन एचडी.

Story img Loader