ब्राझीलच्या फुटबॉल संघाचा प्रमुख आधारस्तंभ आणि संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेला नेयमार फुटबॉल विश्वचषकातील आगामी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. उपांत्यपूर्व फेरीतील कोलंबियाविरूद्धच्या सामन्यात खेळताना नेयमारच्या मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. सामना संपण्यास काहीच मिनिटे असताना चेंडू क्‍लियर करताना कोलंबियाचा बचावपटू जुआन झुनिंगा याचा गुडघा नेयमारच्या पाठीत जोराने बसला. त्याचवेळी त्याने हाताने त्याच्या मानेवर दाब दिल्याने असह्य वेदनेने नेयमार मैदानावर कोसळला. पालथा पडलेल्या नेयमारला पाठीवर वळतानाही वेदना होत होत्या. मैदानावरूनच त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आले. संघाचे डॉक्‍टर रॉड्रिगो लॅसमार यांनी त्याच्या मणक्‍यात फ्रॅक्‍चर असल्याचे सांगितले. दरम्यान, कोलंबियाविरुद्धचा सामना २-१ असा जिंकण्यात ब्राझीलला यश आले असले तरी, चाहत्यांना नेयमारच्या दुखापतीची चिंता सतावत होती. त्याची ही दुखापत गंभीर असू नये, अशी आशा ब्राझीलचे चाहते मनोमन बाळगून होते. मात्र, नेयमारच्या मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने आपल्या हुकमी एक्क्याशिवाय ब्राझीलची आगामी वाटचाल खडतर ठरणार आहे.