Roger Binny Latest News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळामधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयला आता नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली भूषवत आहेत. मात्र, त्यांच्या अध्यक्षपदाचे आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. लवकरच बीसीसीआयच्या सर्व पदांसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. मात्र, गांगुली पुन्हा या पदाचे दावेदार नसतील अशी माहिती समोर येत आहे. अशात बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना एकाचे नाव निश्चित झाले आहे.
माजी वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी, जे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा महत्त्वाचा भाग होते, ते सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. एएनआयच्या वृत्तानुसार, सचिव जय शाह त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. यासाठी दोन नावे पुढे येत असताना टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. बिन्नी हे सध्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये आहेत. तसेच ते बीसीसीआयच्या निवडसमितीचेही सदस्य राहिले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार असे समोर येते आहे की, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष बनण्याच्या मूडमध्ये नाहीये. तसेच, सचिव जय शाहदेखील अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत नाहीयेत. मात्र, ते सचिव पदासाठी पुन्हा अर्ज करत आहेत.
बीसीसीआयमधील महत्त्वाच्या पदांसाठी मंगळवारपासून (११ ऑक्टोबर) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि सहसचिव या पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी नामांकन होणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर आहे. त्याच वेळी, विद्यमान सचिव जय शहा हे त्याच पदासाठी स्वतःला पुन्हा उमेदवारी देऊ शकतात. तर अरुण धुमाळ यांच्या जागी महाराष्ट्र भाजपचे आमदार आशिष शेलार खजिनदार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND vs SA 3rd ODI: राजधानी दिल्लीतील पावसाने सामन्यावर पडू शकते विरजण, जाणून घ्या
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक अशातच अध्यक्ष पदासाठी दावेदारी ठोकत आहे, त्यामध्ये बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची नावे समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की, याबाबत बैठकाही झाल्या आहेत, ज्यामध्ये बीसीसीआयचे अनेक दिग्गज सामील झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या गुरुवारीही बोर्डाच्या अनेक वरिष्ठ सदस्यांची महत्त्वाची बैठक झाली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि अनेक बडे अधिकारी दिल्लीतील बैठकीला उपस्थित होते.
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या पदांसाठी उमेदवारांची अंतिम यादी:
राजीव शुक्ला : उपाध्यक्ष
जय शाह : सचिव
देवजित सैकिया : संयुक्त सचिव
आशिष शेलार : खजिनदार
अरुण धुमाळ : आयपीएल अध्यक्ष