आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने तान्ह्या बाळांसह महिला खेळाडूंना टोकियोत येण्याची परवानगी दिली आहे. कॅनडाची बॉस्केटबॉलपटू किम गौचर हिने यासाठी परवानगी मागितली होती. गौचरनं आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला टोकियोत नेण्यासाठी विनंती करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता स्तनदा महिला खेळाडूंना दिलासा मिळणार आहे.

या निर्णयापूर्वी ऑलिम्पिक समितीने करोना स्थिती पाहता खेळाडूंच्या कुटुंबियांना टोकियोत येण्यास मनाई केली होती. त्यामुळे किम गौचर हिच्याकडे दोनच पर्याय उपलब्ध होते. एकतर ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागणार होती, किंवा २८ दिवस मुलीविना राहावं लागणार होतं. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने तिची आर्त हाक ऐकली आणि बाळासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. “आम्ही गौचरच्या विनंतीचा मान ठेवला आहे. त्यामुळे सर्व स्तनदा महिला खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यांना बाळासह जापानमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे”, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kimberley Gaucher (@kgaucher)

“आंतरराष्ट्रीय मीडिया आणि प्रायोजकांना जापानमध्ये येण्याची परवानगी आहे. तसेच जापानी प्रेक्षकांना मर्यादित संख्येसह मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आहे. मात्र खेळाडूंना आपल्या बाळांना भेटू दिलं जाणार नाही. मैदानात प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. अर्ध मैदान प्रेक्षकांनी भरलेलं असेल. मात्र मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी नसेल.”, अशी विनवणी किम गौचर हिने इन्स्टाग्रामवरून केली होती.

Euro Cup २०२० स्पर्धेसाठी हजेरी लावलेल्या स्कॉटलँडच्या २००० जणांना करोनाची लागण

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निर्णयामुळे स्तनदा महिला खेळाडूंना दिलासा मिळणार आहे. अमेरिकेची फुटबॉलपटू अलेक्स मॉर्गनलाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. मे २०२० मध्ये तिने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे आता बाळासोबत टोकियोत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गौचर आणि मॉर्गन या दोघीं तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत.

Story img Loader