कबड्डीच्या इतिहासात मंगळवारी प्रथमच ‘अजि सोनियाचा दिनु’ अवतरला. ‘न भूतो न भविष्यती’ असा सन्मान महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आला. महिला विश्वचषक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या महाराष्ट्राच्या तीन सुवर्णकन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे इनाम देऊन हा गौरव करण्यात आला. त्यामुळे समस्त कबड्डीविश्वात आनंद, चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण पसरले. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे मानकरी झाल्याचा आनंद या तिघींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. क्रिकेटप्रमाणे कबड्डी या खेळातसुद्धा एवढय़ा मोठय़ा रकमेचे बक्षीस दिले जाते, याचे अप्रूप सर्वानाच होते. याचप्रमाणे या तिघींनी याचे श्रेय ‘लोकसत्ता’ला दिले. यापुढे ‘श्वास आणि ध्यास कबड्डी’ हाच निर्धार तिघींनी आपल्या प्रतिक्रियांमधून प्रकट केला.
गेल्या वर्षी पाटण्यात झालेल्या महिलांच्या पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पध्रेत भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या तीन मुलींना प्रत्येकी एक कोटीचे तर प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांना २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मान करण्याची घोषणा केली होती. परंतु हा पुरस्कार देण्यात शासनाकडून १३ महिन्यांचा विलंब झाला. पण ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाला जाग आली आणि मंगळवार, २६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या एका कार्यक्रमात कबड्डीपटूंना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष मदन पाटील, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या रमेश भेंडिगिरी थायलंडमध्ये कबड्डी प्रशिक्षण देत आहेत. पुरस्काराचे वृत्त कळताच ‘आपला महाराष्ट्र महान’ अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार उदय चव्हाण यांनी भेंडिगिरी यांच्या वतीने पुरस्काराचा धनादेश स्वीकारला. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि सर्व आमदारांचे आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा