ICC World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात खेळवला जात असून त्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पण सध्याच्या घडीला गतविजेत्या इंग्लंडसाठी एकही गोष्टी योग्य होत नाही. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ अतिशय लाजिरवाणा कामगिरी करताना दिसत आहे. ४ सामन्यांतून एक विजय आणि २ गुणांसह संघ गुणतालिकेत तळाच्या म्हणजेच १०व्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानखेडेवर झालेल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडला २२९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूटने मुंबईतील हवामानाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
मी अशा परिस्थितीत कधीही खेळलो नाही – जो रूट
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ३९९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २२ षटकांत १७० धावांत सर्वबाद झाला. पराभवानंतर जो रूट मुंबईच्या कडक ऊन आणि आर्द्रतेवर आपला राग काढताना दिसत आहे.
एका वेबपोर्टलशी बोलताना जो रुट म्हणाला, “मी यापूर्वी कधीही अशा परिस्थितीत खेळलो नाही. मी जास्त उष्ण आणि दमट परिस्थितीत खेळलो आहे. पण आपण श्वास घेऊ शकत नाही असे कधीच वाटले नाही. जणू काही तुम्ही हवा खात आहात, हे खूप वाईट होते. आपण हेनरिक क्लासेनचे उदाहरण म्हणून पाहू शकता. मैदानात परतता न आल्याने त्याचे किती नुकसान झाले. इतके प्रदूषण आणि खराब हवा यामुळे श्वास गुदमरायला होत होता.”
आदिल रशीदला श्वास घेता येत नव्हता – जो रूट
आदिल रशीदला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जो रूटने पुढे सांगितले. रुट पुढे म्हणाला की, “संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताच अर्ध्या तासात आमची जर्सी पूर्णपणे घामाने भिजली होती.” जो रूट पुढे म्हणाला, ‘रॅश (आदिल रशीद), त्याने संघासाठी आतापर्यंत शानदार कामगिरी केली. तो गोलंदाजी करत असताना त्याला श्वास घेता येत नसल्याने त्याच्या तोंडातून फुटू शकत नव्हता. तो आपला श्वास परत घेण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी अवस्था खूप कठीण होती. परंतु जेव्हा तुम्ही वर्षाच्या शेवटी या वेळी भारतात खेळायला येतो तेव्हा तुम्हाला अशाच गोष्टींचा सामना करावा लागतो. या हवामानासाठी आम्ही देखील संघर्ष करत आहोत.” इंग्लंडचा पुढचा सामना हा श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.