क्रिकेटमध्ये आक्रमकपणा जपत काही फलंदाज गोलंदाजांवर हल्ला चढवतातही; पण याच आक्रमकपणाच्या वादळामध्ये त्यांची कारकीर्द भरडली जाते. वादविवाद, अहंभाव, अश्लील हावभाव यामुळे त्यांच्यातला सभ्य क्रिकेटपटू हरवून जातो. ब्रेंडन मॅक्क्युलम हाही एक योद्धाच.

योद्धा म्हटला की, त्याच्यात आक्रमकता असायलाच हवी, पण जेव्हा हा योद्धा शांतपणे विचार करायला लागतो, सहकाऱ्यांची गुणवत्ता जोखून रणनीती आखायला सुरुवात करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. क्रिकेटमध्ये आक्रमकपणा जपत काही फलंदाज गोलंदाजांवर हल्ला चढवतातही; पण याच आक्रमकपणाच्या वादळामध्ये त्यांची कारकीर्द भरडली जाते. वादविवाद, अहंभाव, अश्लील हावभाव यामुळे त्यांच्यातला सभ्य क्रिकेटपटू हरवून जातो. ब्रेंडन मॅक्क्युलम हाही एक योद्धाच. आक्रमकता त्याच्याही फलंदाजीत होतीच; पण शांतपणे विचार करण्याची कुवतही त्याच्यात होती. त्यामुळेच तो संघाचे हिमतीने नेतृत्व करू शकला. फक्त एवढेच नाही, तर देशाची प्रतिमाही त्याने सुधारली. १०-१२ वर्षांपूर्वी न्यूझीलंडला परदेशी भूमीवर पराभूत करणे फारसे अवघड नव्हते; पण त्याने हे चित्र बदलले. ऑस्ट्रेलियासारख्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यालाही त्याने दखल घ्यायला लावली. आक्रमक फलंदाज, या कोषात न अडकता तो एक चाणाक्ष कर्णधारही ठरला; पण भविष्याचा विचार करत आपल्या शंभराव्या कसोटीचे औचित्य साधून त्याने निवृत्तीचाही विचार केला. सभ्य या खेळाच्या प्रतिमेला जागणारा हा योद्धा म्हणजे ब्रेंडन मॅक्क्युलम.

अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या रूपात क्रिकेटजगताने यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज हे मिश्रण पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर याच रूपात क्रिकेटविश्वासमोर आला तो ब्रेंडन. धडाकेबाज फलंदाजी करत त्याने गोलंदाजीतही कर्तृत्व सिद्ध केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा सर्वोत्तम धावांचा विश्वविक्रमही त्याने मोडीत काढला होता. आयपीएलमधील पहिले शतकही त्याच्याच नावावर. ब्रेंडनची फलंदाजी ही नेत्रसुखद अनुभूती असते. खेळात आक्रमकता असली तरी त्याची खेळी कधीही गेलसारखी गोलंदाजीची कत्तल करणारी वाटली नाही. शांतपणे तो गोलंदाजांवर अधिराज्य गाजवायचा. एकदिवसीय क्रिकेटमध्येही जशी त्याच्या फलंदाजीची चर्चा व्हायची, तशीच कसोटीतही. ब्रेंडनने न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावण्याचा मानही पटकावला. भारताविरुद्धची त्याची ही खेळी त्याच्या आक्रमकतेच्या विरुद्ध अंगाने जाणारी होती. न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. कदाचित एका डावाने पराभूत होण्याची नामुश्कीही त्यांच्यावर ओढवली असती. या खेळीमध्ये त्याच्या ३०२ धावांपेक्षा त्याच्या मानसिकतेचे अधिक कौतुक करण्यासारखे आहे, कारण ही मानसिकता फार कमी फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. बॅटने फक्त फटकेबाजी करायची नसते, तर तिच्या जोरावर अभेद्य बचाव आणि उपयुक्त फटकेबाजी करून परिस्थिती पालटवता येऊ शकते, हे ब्रेंडनने या खेळीत दाखवून दिले. त्याची ही खेळी क्रिकेटचाहत्यांच्या मनात चिरतरुण राहणारी अशीच. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाला मालिकेत पराभूत करून निवृत्ती घेतली आणि देशाला चॅपेल-हेडली चषक जिंकवून दिला.

एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार मारण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. स्कूपचे फटके ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्रास वापरले जात असताना कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा ब्रेंडनने पहिल्यांदा अवलंब केला. क्रिकेटच्या पुस्तकातले फटके त्याला माहीत होतेच, पण नवीन फटके मारण्यात तो कधी कचरला नाही. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता, त्या वेळी राहुल द्रविड चांगल्या फॉर्मात होता. फिरकी गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारत तो धावा जमवत होता. हे यष्टिरक्षण करणाऱ्या ब्रेंडनच्या लक्षात आले. त्याने द्रविडच्या हालचाली ओळखल्या आणि उजव्या यष्टीच्या बाहेर उभे राहत त्याने द्रविडचा झेल टिपला. त्याच्या या कौशल्याने वाद झाला खरा, पण त्याचा चाणाक्षपणा वाखाणण्याजोगाच होता.

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्‍स सामनानिश्चिती प्रकरणात अडकल्यावर आयसीसीला त्याबाबत मदत केली ती ब्रेंडनने. क्रिकेट हा खेळ सभ्यतेने खेळला जावा, असे ब्रेंडनला नेहमीच वाटत आले. त्यामुळे तो क्रिकेटमधल्या गैरव्यवहारापासून दूर राहिलाच, पण गैरव्यवहार करणाऱ्यांना शासन होण्यासाठीही तो प्रयत्नशील असायचा.

न्यूझीलंडला जिंकण्याची सवय लावणारा कर्णधार म्हणून ब्रेंडनचे नाव घेता येईल. खेळाडूंची मोट बांधून कोणत्याही परिस्थितीत संघाचे जहाज पैलतीरी पोहोचवण्याचे कसब त्याच्याकडे होते. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने २०१५ साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली होती, पण त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. त्याने एकूण ६१ सामन्यांमध्ये देशाचे नेतृत्व करताना ३५ विजय मिळवले. शतक झळकावून निवृत्ती स्वीकारावी, असे मनसुबे त्याने आखले नाहीत किंवा त्याला निवृत्ती घेण्यासाठी कुणीही दबाव आणला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शंभरावा कसोटी सामना खेळण्याचा योग त्याच्या आयुष्यात आला आणि ही मालिका कारकीर्दीतील अखेरची असेल, हे त्याने निश्चित केले. स्वत:च्या विक्रमांपेक्षा देशाच्या क्रिकेटची प्रतिमा आपण बदलू शकलो, याचेच समाधान त्याला जास्त असेल.

प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com