फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी मालिका
फेब्रुवारीत मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार असल्याची घोषणा न्यूझीलंडचा संघनायक ब्रेंडन मॅक्क्युलमने मंगळवारी केली.
पदार्पणापासून सलग १०० कसोटी खेळण्याचा जागतिक विक्रम ३४ वर्षीय मॅक्क्युलमच्या दृष्टीक्षेपात आहे. बेसिन रिव्हर्सला १२ फेब्रुवारीपासून सुरू होणारी कसोटी ही त्यामुळे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर हॅगले ओव्हल येथे २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीनंतर तो अलविदा करणार आहे.
मॅक्क्युलमच्या निवृत्तीनंतर ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत केन विल्यमसन न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करावी, म्हणून निवृत्तीची घोषणा घाईने केल्याचे मॅक्क्युलमने सांगितले.
‘‘ख्राइस्टचर्चच्या कसोटी सामन्यापर्यंत मी ही घोषणा करायला नको होती, परंतु आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड जाहीर करण्यासाठी थोडा अवधी शिल्लक आहे. संभ्रम, अफवा, आदी बऱ्याच गोष्टी टाळाव्यात, या हेतूने मी ही घोषणा करीत आहे,’’ असे मॅक्क्युलमने सांगितले. नुकताच न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळवला आहे.
‘‘किवी संघाचे नेतृत्व करायला मला अतिशय आवडते, परंतु कोणत्याही चांगल्या गोष्टीचा शेवट कधी तरी होत असतो. पण देशाचे प्रतिनिधित्व करताना मिळालेला अनुभव माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा असेल,’’ असे मॅक्क्युलमने सांगितले.
मॅक्क्युलमची आकडेवारी
प्रकार सामने धावा शतके
कसोटी ९९ ६२७३ ११
एकदिवसीय २५४ ५९०९ ५
ट्वेन्टी-२० ७१ २१४० २