ऑस्ट्रेलियात मागील महिन्यात रंगलेल्या टी-२० विश्वचषक करंडक स्पर्धेत इंग्लंडने भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला. त्यामुळे आयसीसीच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या पदरी निराशाच पडली. या पराभवानंतर बीसीसीआयसह भारतीय खेळाडूंना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. २०१३ नंतर भारतीय संघाने आजतागायत आयसीसीची ट्रॉफी जिंकली नाहीय. त्याचदरम्यान एम एस धोनीने निवृत्ती घोषीत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाची कमान सांभाळली. यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून आणि राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतरही भारताला विश्वचषक जिंकता आलं नाही.
मात्र, भविष्यात भारतीय संघाला विश्वचषकाच्या जेतेपदाला गवसणी घालता येऊ शकते. भारतीय संघात एक जबरदस्त खेळाडू आहे. हा खेळाडू भारतीय संघाला आयसीसीच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये विजय मिळवून देऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेटलीने माध्यमांशी बोलताना दिली आहे. ब्रेट लीने भारताच्या नेमक्या कोणत्या खेळाडूबद्दल विश्वास व्यक्त केला आहे, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
भारतीय क्रिकेट संघातील हा खेळाडू विश्वचषक जिंकवून देणार, ब्रेट ली म्हणाला…
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवना गोलंदाज ब्रेट लीने भारतीय क्रिकेटच्या आजच्या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ब्रेट ली त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, भारतीय संघात असा एक जबरदस्त खेळाडू आहे, जो भारताला आगामी होणाऱ्या विश्वचषक करंडक स्पर्धेत विजय संपादन करुन देऊ शकतो. त्याच्याकडे सामने जिंकवून देण्याची जबरदस्त क्षमता आहे आणि तो दुसरा तिसरा कुणी नाही तर त्याचं नाव आहे सूर्यकुमार यादव. ज्याने टी२० क्रिकेटमध्ये मैदानात चौफेर फटकेबाजी करून धावांचा पाऊस पाडला आहे. भारताने दिर्घकाळापासून विश्वचषक जिंकला नाहीय. आता भारताकडे सूर्यकुमार सारखा खेळाडू आहे. तो टी-२० चा जागतीक पातळीवरील स्टार खेळाडू आहे. मागील १२-१५ महिन्यांपासून क्रिकेटच्या मोठ्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केलीय. त्याची बिंधास्त खेळी, शॉट सिलेक्शन आणि आक्रमक मारा तो एक जबरदस्त चेजमास्टर असल्यांचं दर्शवतो, असं ब्रेट लीनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात अप्रतिम फलंदाजी करून माझं मन जिंकलं आहे. विशेष म्हणजे तो प्रत्येक सामन्यात त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करतो. तो फक्त धावांचाच पाऊस पाडत नाहीय, तर तो भारताला एक दिवस विश्वचषक जिंकवून देईल. त्या मैदानात खेळताना मला पाहायला आवडतं. मी त्याला कोणत्याही प्रकारचा सल्ला देणार नाही. जशाप्रकारे तो खेळत आहे तसंच त्याने खेळावं. त्याने खेळण्याच्या शैलीत बदल करू नये. सूर्यकुमारने गुंतागुंतीचा खेळ करू नये. स्वत:च्या शैलीत खेळत राहावं, असंही ब्रेट ली म्हणाला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी सूर्यकुमार यादववर विश्वास ठेवावा, त्याला जसं व्यक्तीमत्व घडवायचं आहे, तशाच गोष्टी त्याला करु द्या. भविष्यातही सूर्यकुमार चमकेल आणि खूप सामने जिंकवून देईल, असाही विश्वास ब्रेटलीने व्यक्त केला.