ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजने ही मालिका बरोबरीत सोडवली आहे. द गॅबाच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी (पिंक बॉल टेस्ट) सामन्यात पराभूत करणारा पहिलाच संघ ठरला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. वेस्ट इंडिजकडून शमर जोसेफने शानदार गोलंदाजी केली. शमर जोसेफला त्याच्या दोन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त खेळाबद्दल सामनावीर (दुसऱ्या सामन्यात) आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवण्यात आलेला सामना वेस्ट इंडिजने ८ धावांनी जिंकला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात शमर जोसेफने ७ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात एका फलंदाजाला बाद केलं होतं. शमर जोसेफने या मालिकेतील दोन्ही सामन्यात मिळून १३ बळी घेतले. मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकला होता. दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा जमवल्या होत्या. हा संघ दुसऱ्या डावात १९३ धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ गड्यांच्या बदल्यात २८९ धावा करून घोषित केला होता. कांगारुंच्या संघाला दुसऱ्या डावात केवळ २०७ धावा करता आल्या.
दरम्यान, वेस्ट इंडिजने ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा समालोचन करत होता. वेस्ट इंडिजच्या विजयानंतर त्याने एकच जल्लोष केला. परंतु, त्याचवेळी त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. लारा म्हणाला, तब्बल २७ वर्षांनंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्यात यशस्वी ठरलो. फारसा अनुभव नसलेल्या नवोदित खेळाडूंच्या संघाने बलाढ्य आणि वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. पुढील अनेक वर्षे हा विजय वेस्ट इंडिज समर्थकांच्या स्मरणात राहील.
हे ही वाचा >> IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक द गॅबा हे मैदान म्हणजे ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला मानला जातो. १९८८ नंतर कांगारूंनी या मैदानावर अनेक वर्षे पराभव पाहिला नव्हता. परंतु, २०२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने कांगारूंच्या संघाला या मैदानात धूळ चारली होती. कॅरेबियन संघाने आज त्याचीच पुनरावृत्ती केली.