वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी लाराच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ग्लोबल रुग्णालयात डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली लारावर अँजिओग्राफी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर लाराच्या प्रकृतीला धोका नसल्याचं समोर येताच, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्रायन लारा सध्या विश्वचषकानिमीत्त मुंबईत एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून हजर आहे. मंगळवारी लाराला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येताच, “माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. माझ्या प्रकृतीत झटपट सुधारणा होत असून मी उद्याच डिस्चार्ज घेऊन माझ्या हॉटेलवरील रूममध्ये शिफ्ट होत आहे. माझ्या प्रकृतीत अचानक काय बिघडले अशी काळजी सगळ्यांनाच होती. कदाचित मी जिममध्ये जास्तीचा व्यायाम केला. त्यामुळे माझ्या छातीत दुखू लागले. डॉक्टर कडे जाणे हे मला इष्ट वाटले म्हणून मी रुग्णायल्यात दाखल झालो होतो. गरजेच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि मी सध्या झकासपैकी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना टीव्हीवर पाहत आहे”, असे ब्रायन लाराने सांगितले होते.

Story img Loader