कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर जमा आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला, मात्र लाराचा हा विक्रम अद्यापही अबाधित आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरला हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र वॉर्नर ३३५ धावांवर असताना कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित केला, त्यामुळे पुन्हा एकदा लाराचा विक्रम अबाधित राहिला.
यानंतर डेव्हिड वॉर्नरनेही पत्रकार परिषदेत बोलत असताना, भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये लाराचा ४०० धावांचा विक्रम मोडू शकतो असं म्हटलं होतं. आता दस्तुरखुद्द ब्रायन लारानेही आपला विक्रम मोडण्याची क्षमता दोन भारतीय खेळाडूंमध्ये असल्याचं म्हटलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही खेळाडू मुंबईकर आहेत.
“रोहित शर्मा सारखा खेळाडू हे नक्की करु शकतो. जर तो फॉर्मात असेल आणि त्याला चांगली सुरुवात मिळाली, तर तो हा विक्रम नक्कीच मोडू शकतो. पृथ्वी शॉ हा देखील एक चांगला पर्याय आहे. मध्यंतरी तो क्रिकेटपासून दूर होता, पण तो लवकरच पुनरागमन करेल अशी मला आशा आहे”, ब्रायन लारा एका वृत्तसंस्थेशी बोलत होता. उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात पृथ्वीवर काही महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र यानंतर पृथ्वीने दमदार पुनरागमन करत, आपण अजुनही फॉर्मात असल्याचं सिद्ध केलं आहे.