ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही आपल्या दृष्टीने उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. मात्र, ब्रायन लाराने सचिन तेंडुलकरपेक्षा स्वतःच्या संघाला जास्त विजय मिळवून दिले ही वस्तुस्थिती असल्याचे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पॉंटिंगने म्हटले आहे.
‘इव्हिनिंग स्टॅंडर्ड’ला दिलेल्या मुलाखतीत रिकी पॉंटिंगने या दोन्ही महान क्रिकेटपटूंबद्दलची आपली मते सडेतोडपणे मांडली. तो म्हणाला, सचिन आणि लारा हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना दुसऱया दिवशी लारा फलंदाजीला येणार असल्यास मला रात्रभर झोप लागायची नाही. मात्र, सचिनच्या बाबतीत तसे कधी घडले नाही. सचिनला मैदानावर रोखायचे ठरवल्यास तुम्हाला पर्याय सापडू शकतो. पण, लारा अवघ्या अर्धा तासात सामन्याचा रंगच पालटायचा आणि सामना स्वतःच्या संघाच्या दिशेने खेचून आणायचा. स्वतः किती शतके केली, हे माझ्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते. तुमच्यामुळे संघाने किती सामने जिंकले आणि किती मालिका खिशात घातल्या, हेच जास्त महत्त्वाचे आहे.
सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेत पहिल्या कसोटीत जरी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवले असले, तरी ही मालिका ऑस्ट्रेलिया २-१ने नक्की जिंकेल, असा विश्वास रिकी पॉंटिंगने व्यक्त केलाय.

Story img Loader