ऑलिम्पिकमध्ये पदकांची खैरात करण्याची क्षमता आपल्या देशातील नेमबाजांकडे आहे हे आपल्या संघटकांना जरा उशिराच कळाले. आंतरराष्ट्रीय व जागतिक स्पर्धाच्या मालिकेत पदकांची लयलूट करणाऱ्या आपल्या नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याकरिता बराच काळ वाट पाहावी लागली. तथापि, आगामी काळात पदकांची वाटचाल कायम राहणार आहे, कारण पदकांची क्षमता असलेल्या नैपुण्याचा खजिना आपल्याकडे विपुल प्रमाणात आहे. या खजिन्याचे नीट जतन केले तर निश्चितच नेमबाजांची वाटचाल तेजोवलयाकडे राहील.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत आपण पदक मिळवू शकतो हे राजवर्धनसिंह राठोड याने अथेन्समध्ये दाखवून दिले. त्याने मिळविलेल्या रौप्यपदकामुळे नेमबाजीविषयी सर्वसामान्य लोकांना हाही एक क्रीडा प्रकार आहे हे कळण्यास सुरुवात झाली. अभिनव बिंद्रा याने बीजिंग येथील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेत भारताच्या इतिहासात नवा अध्याय निर्माण केला. ऑलिम्पिक स्पर्धेमधील वैयक्तिक क्रीडाप्रकारात ते भारताचे पहिलेच सुवर्णपदक होते. त्याच्या या सोनेरी यशामुळे या खेळाची लोकप्रियता वाढली. या खेळात करिअर केले जाऊ शकते याची जाणीव खेळाडूंना व त्यांच्या पालकांनाही होऊ लागली. सचिन तेंडुलकर याच्या विक्रमी यशाकडे पाहून अनेक पालकांनी आपल्या नवजात मुलाचे नाव सचिन ठेवले. राजवर्धनसिंह राठोड व अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळविल्यानंतर त्यांची नावे आपल्या नवजात बालकास देणारेही आहेत, हीच या नेमबाजीतील यशाची किमया आहे.  
नेमबाजी हा खेळ आपल्याकरिता नवीन नाही. भारतात बंदुका आल्यानंतर पूर्वीच्या काळी संस्थानिक शिकारीचा खेळ बंदुकांच्या साहाय्याने खेळत असत. सेनादलात त्याचा सर्रास उपयोग लढायांकरिता होत असला तरी खेळ म्हणून या खेळास खूप काही मर्यादा होत्या. बंदुका व त्याचे अ‍ॅम्युनिशन या सर्वसामान्यांना आर्थिकदृष्टय़ा न परवडणाऱ्या गोष्टी मानल्या जात होत्या. शाळा व महाविद्यालयात एनसीसी करणाऱ्यांना या बंदुकांचा उपयोग करण्याची संधी मिळत असे. शाळा व महाविद्यालयात एनसीसी विभागप्रमुखांकडेच अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची जबाबदारी सोपविली असायची. असे शिक्षक किंवा विभागप्रमुख शाळा किंवा महाविद्यालयात दिसले की, ‘अरे, ठो-ठो करणारे शिक्षक आले,’ असा शेरा ऐकायला येत असे. नेमबाजीच्या स्पर्धाही खूप कमी होत्या. एखाद्या बागेपाशी छऱ्यांच्या साहाय्याने बंदुकीद्वारे फुगे फोडून आपली नेमबाजीची हौस भागविण्याइतपतच या खेळाची लोकप्रियता होती.
राजवर्धनने ऑलिम्पिक रौप्यपदक मिळविण्यापूर्वीही आपल्याकडे ऑलिम्पिक पदकांची क्षमता असणारे अनेक नेमबाज होते. शीला कानुगो, अशोक पंडित, सुमा शिरुर, अंजली भागवत, जसपाल राणा आदी खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये जागतिक विक्रमाइतकी कामगिरी केली. त्यांच्यावेळी हल्लीसारखे परदेशी प्रशिक्षक, विपुल प्रमाणात अ‍ॅम्युनिशन, फिजिओ आदी सुविधा सर्रासपणे उपलब्ध नव्हत्या. आर्थिक मर्यादाही त्या वेळी होत्या. शासनाचा मुळातच खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नव्हता तर बिचारे नेमबाज हे त्यांच्यासाठी अपरिचितच असायचे. अशाही परिस्थितीत पूर्वीच्या खेळाडूंनी जागतिक स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करीत या खेळाकडे ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून पाहण्यासाठी वातावरण निर्मिती केली. नेमबाजीसाठी चांगली शूटिंग रेंज नाही, अ‍ॅम्युनिशनची कमतरता, ते मिळविताना होणाऱ्या कटकटी, अ‍ॅम्युनिशन आयात करताना येणाऱ्या अडचणी, स्पर्धाकरिता पुरस्कर्त्यांची वानवा अशा अनेक समस्यांना तोंड देत आपल्या नेमबाजांनी १९९६ नंतर जागतिक स्पर्धामध्ये भारतास नावलौकिक मिळवून दिला. तेव्हापासूनच या खेळाबाबत आशादायक चित्र दिसू लागले. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राजवर्धन याने रुपेरी वेध घेतला आणि या खेळास सुगीचे दिवस दिसू लागले. राजवर्धन हा सेनादलात असल्यामुळे अ‍ॅम्युनिशन, फिजिओ व अन्य सुविधांबाबत त्याला कसलीच अडचण नव्हती. सेनादलात असल्यामुळे नोकरी मिळविण्याकरिता होणाऱ्या कटकटी त्याला नव्हत्या. फक्त सराव करणे हेच त्याचे काम असल्यामुळे त्याने पूर्णवेळ ऑलिम्पिकच्या सरावावर लक्ष केंद्रित केले आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले. त्याने अथेन्समध्ये भारतीय नेमबाजांसाठी पदकांचे द्वार खुले केले. त्याने मिळविलेले हे यश म्हणजे काही चमत्कार नव्हता हे अभिनवने सुवर्णपदकाद्वारे दाखवून दिले. लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये विजयकुमारने रौप्य, तर गगन नारंग याने कांस्यपदक मिळवीत नेमबाजीतील यशाची चढती कमान सुरूच ठेवली. आतापर्यंत नेमबाजांनी मिळविलेल्या चार पदकांमुळे शासन व पुरस्कर्त्यांचा नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. या खेळातही करिअर करता येते हे आश्वासक चित्र निर्माण झाले. नारंग याने लंडन ऑलिम्पिकपूर्वीच पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे आपली नेमबाजी अकादमी सुरू केली. येथील शूटिंग रेंज ही जगातील अव्वल दर्जाच्या रेंजपैकी एक रेंज असल्याची पावती अनेक परदेशी खेळाडूंनी व संघटकांनी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या वेळी दिली आहे. या अकादमीतून नारंग व विजयकुमार हे ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू तयार झाले. त्याखेरीज राही सरनोबत हिच्यासह अनेक ऑलिम्पिकपटूही येथेच तयार झाले आहेत. अलीकडेच राही हिने जागतिक स्पर्धेत सुवर्णवेध घेत या अकादमीस देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. त्यापूर्वीही तेजस्विनी सावंत हिने जागतिक स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णवेध घेतला आहे. नवनाथ फरताडे, तेजस्विनी मुळे, रौनक पंडित, पूजा घोटकर, विक्रांत घैसास आदी अनेक उदयोन्मुख मराठी नेमबाज येथे घडत आहेत. हा खेळ थोडासा महाग असला तरी या खेळाडूंकरिता प्रायोजक मिळू लागले आहेत. शासनही खेळाडूंना अ‍ॅम्युनिशन देऊ लागले आहे. त्यांच्या अडचणी दूर करण्याबाबत प्राधान्य देत आहे. त्यामुळे बेताचीच आर्थिक स्थिती असलेले अनेक पालकही आपल्या पाल्यांना या खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धाडस करू लागले आहेत. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या अन्य काही आदिवासी भागातील शालेय खेळाडूही या खेळाकडे वळू लागले आहेत.
सनी थॉमस, डॉ. भीष्मराज बाम, अशोक पंडित, शीला कानुगो यांच्यासारखे खेळावर जीव ओतून प्रेम करणारे मार्गदर्शकही त्यांना मिळाले आहेत. अनेक परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ हल्लीच्या खेळाडूंना मिळू लागला आहे. अभिनव, नारंग, विजयकुमार यांनी मिळविलेल्या ऑलिम्पिक पदकांमध्ये परदेशी प्रशिक्षक व परदेशातील सराव या दोन्ही गोष्टींचा महत्त्वाचा वाटा होता. राजवर्धनपासून भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय नेमबाजांना परदेशातील स्पर्धा व सराव शिबिरांमध्ये भाग घेण्याची, तसेच त्यांच्याकरिता परदेशी प्रशिक्षक दीर्घ कालावधीकरिता नेमण्यासाठी शासनाने भरघोस आर्थिक मदत केली आहे.
कुस्तीत ऑलिम्पिक पदकांची आशा दिसत असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेच कुस्तीस ऑलिम्पिकमधून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य खेळांमध्ये पदकांच्या आशा धूसर वाटत असताना नेमबाजीत मात्र भारतीय खेळाडूंना उज्ज्वल भवितव्य आहे, ग्लॅमर व पैसा आहे हे जाणवू लागले आहे. ही आशादायक वाटचाल कायम राहण्यासाठी सर्व संबंधितांनी आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ओळखून त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा