गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ब्रिजभूषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना लवकरच शिक्षा होईल, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. हे आरोप झाल्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे धरले होते. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. दोन महिने चाललेल्या या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले असून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कलम ५०६ (धमकी देणे), ३५४ (विनयभंग); ३५४ अ (लैंगिक छळ); आणि ३५४ डी (पाठलाग करणे) सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सहापैकी दोन प्रकरणांमध्ये, सिंग यांच्यावर कलम ३५४, ३५४अ आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम 354 आणि ३५४ अ अंतर्गत ब्रिजभूषण यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते.
सुनावणी होणार, शिक्षाही होईल- दिल्ली पोलीस
ब्रिजभूषण यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने त्यांना आता सुनावणीसाठी बोलावले जाऊ शकते. तसंच, या चार्जशीटमध्ये ज्या साक्षीदारांची नावे आहेत, त्यांनाही बोलावले जाणार आहे, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तर, सुनावणीअंती ब्रिजभूषण यांना शिक्षाही सुनावली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
१०८ साक्षीदारांची चौकशी
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी १०८ साक्षीदारांची चौकशी केली. यामध्ये कुस्तीपटू, प्रशिक्षक यांच्यासह १५ जणांनी जबाब नोंदवला आहे.
लैंगिक छळासह १५ आरोप महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात केले होते. तक्रारीतही या प्रकरणाची नोंद आहे. अयोग्य स्पर्श, आमिष दाखवणे, श्वास तपासण्याच्या उद्देशाने स्पर्श करणे आदी आरोप तक्रारीत करण्यात आले होते. परंतु, हे आरोप ब्रिजभूषण यांनी फेटाळून लावले होते. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आता सुनावणी होणार आहे.