भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची गुरुवारी निवड झाली. संजय सिंह यांनी माजी कुस्तीगीर अनिता श्योरण यांचा ४० विरुद्ध सात मतांनी पराभव केला. सिंह यांच्या निवडीनंतर ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिक हिने निवृत्तीची घोषणा केली असून विनेश फोगाट, बजरंग पुनिया या आघाडीच्या कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर, “पहिल्या दिवसापासून निवडणूक आमच्या हातात होती. सत्याचा विजय झाला,” अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली आहे. तसेच, “ब्रिजभूषण सिंह हे मला मोठ्या भावासारखेच आहेत,” असंही संजय सिंह यांनी म्हटलं.

“११ महिन्यांपासून कुस्तीपटूंच्या सर्व स्पर्धा बंद”

संजय सिंह म्हणाले, “कुस्तीपटूंसाठी केलेल्या कामांमुळे आम्हाला निवडून येण्याचा विश्वास होता. कुस्तीपटूंना माहिती की, फक्त आम्हीच त्यांचे प्रश्न सोडावू शकतो. गेल्या ११ महिन्यांपासून कुस्तीपटूंच्या सर्व स्पर्धा बंद होत्या. त्यामुळे कुस्तीपटू निराशेच्या गर्तेत होते.”

हेही वाचा : महिला कुस्तीगिरांच्या शोषणाची भीती कायम! कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांच्या निवडीनंतर विनेश फोगटचे वक्तव्य

“१५ आणि २० वर्षाखालील कुस्तीपटूंचे राष्ट्रीय सामने आयोजित करू”

१५ आणि २० वर्षाखालील कुस्तीपटूंचे राष्ट्रीय सामने नंदिनी नगर आणि गोंडा येथे होतील, असं संजय सिंह यांनी सांगितलं. “२०२३ हे वर्ष संपवण्याआधी १५ आणि २० वर्षाखालील कुस्तीपटूंचे राष्ट्रीय सामने आयोजित करू. जेणेकरून युवा कुस्तीपटूंचे संपूर्ण वर्ष वाया जाणार नाही,” असं सिंह यांनी स्पष्ट केलं.

“ब्रिजभूषण सिंह हे माझ्या मोठ्या भावासारखे”

२००९ साली ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते, तेव्हा संजय सिंह हे उपाध्यक्ष होते. ब्रिजभूषण सिंह यांच्याशी फार पूर्वीपासून मैत्री असल्याचं संजय सिंह यांनी म्हटलं. “ब्रिजभूषण सिंह हे मला मोठ्या भावासारखे आहेत. ब्रिजभूषण सिंह आणि आमचे कुटुंब काशी व अयोध्येत कुस्त्यांच्या स्पर्धांचे आयोजन करायचे, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो,” असं संजय सिंह म्हणाले.

हेही वाचा : ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष, साक्षी मलिकने घेतला निवृत्तीचा निर्णय; म्हणाली, ‘आम्ही ४० दिवस…’

“हा कुस्तीपटूंचा विजय आहे”

साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंना आता वेगळी वागणूक दिली जाईल का? या प्रश्नावर संजय सिंह यांनी म्हटलं, “कोणत्याही कुस्तीपटूला वेगळी वागणूक देण्याची आमची इच्छा नाही. जो कुणी चांगली कुस्ती खेळेल त्यांचं स्वागत आहे. हा केवळ आमचा नाहीतर कुस्तीपटूंचा विजय आहे.”

“ऑलिम्पिकच्या तयारीसाठी कुस्तीपटूंना सर्वतोपरी मदत करू”

साक्षी मलिकच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारल्यावर संजय सिंह म्हणाले, “मला या विषयावर कुठलीही चर्चा करायची नाही. कोण काय म्हणते, यानं मला फरक पडत नाही. येणाऱ्या वर्षात ऑलिम्पिकच्या तयारीसाठी कुस्तीपटूंना सर्वतोपरी मदत करू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brij bhushan sharan singh like an elder brother to me sanjay singh talk sakshi malik retirement ssa