Vinesh Phogat Disqualification: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरल्यानंतर संपूर्ण भारतातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेकांनी ऑलिम्पिकच्या नियमांवर नाराजी व्यक्त केली. विनेश फोगट भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मागच्या वर्षी आंदोलन केल्यामुळे चर्चेत आली होती. आज विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि कैसरगंजचा खासदार करण भूषण सिंह याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतून बाहेर पडत असताना एएनआय वृत्तसंस्थेने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हे देशाचे नुकसान आहे. भारतीय कुस्ती महासंघ याबाबत काय करू शकतो, याचा विचार करेल.

हे वाचा >> “विनेशविरोधात ब्रिजभूषण सिंह यांचा सर्वात मोठा कट, त्यामुळेच…”; सासऱ्यांचा गंभीर आरोप

करण भूषण यांचे वडील ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप महिला कुस्तीपटूंनी केले होते. विनेश फोगट आणि इतर महिला कुस्तीपटूंनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

आज (दि. ७ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात विनेश फोगट गेली होती. मात्र सामन्यापूर्वी घेतलेल्या वजन चाचणीत तिचे वजन १०० ग्रॅमने वाढलिले दिसले. त्यामुळे तिला अपात्र करण्यात आले.

हे ही वाचा >> Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”

मंगळवारी (दि. ६ ऑगस्ट) कुस्तीच्या अंतिम सामन्यात पोहोचणारी विनेश फोगट पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली होती. त्यामुळे ती सुवर्ण किंवा रौप्य पदक नक्कीच जिंकेल, याचा सर्वांना विश्वास होता. मात्र आज सकाळी ५० किलोहून १०० ग्रॅम वजन अधिक आढळल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे तिला ऑलिम्पिकचा अंतिम सामना खेळता येणार नाही, तसेच रौप्य पदकही मिळणार नाही.

ही बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “विनेश, तू चॅम्पियन्सची चॅम्पियन आहेस. तू प्रत्येक भारतीयाची प्रेरणा आणि अभिमान आहेस. आज झालेली घटना दुःखद आहे. तू प्रत्येक आव्हान मोठ्या हिमतीने पेलत आलेली आहेस. यातून तू आणखी ताकदीने बाहेर पडशील, याची मला खात्री आहे. आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत.”

दरम्यान भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने सांगितले, “आम्हाला भारताला ही बातमी देण्यास अतीव दुःख होत आहे की, ५० किलो वजनी गटात विनेश फोगट अपात्र ठरली. आम्ही रात्रभर बरेच प्रयत्न केले, तरीही आज सकाळी काही ग्रॅम वजन अधिक भरले.”