अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैगिंक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या समितीमध्ये मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि दोन वकिलांचा समावेश आहे. यापैकी सहदेव यादव यांनी सांगितले आहे की, आम्ही बसून सर्वांचे म्हणणे ऐकू, आरोप पाहिल्यानंतर निष्पक्ष तपास करू आणि निष्पक्ष न्याय देण्याचा प्रयत्न करू.

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर अंशूने असंही म्हटलं आहे की मलाच नाही तर प्रत्येक मुलीला चुकीचं वाटेल असं वर्तन ब्रिजभूषण सिंह यांचं आहे.

अंशू मलिकने काय म्हटलं आहे ?-

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हे जेव्हा स्पर्धा असताना शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक महिला पहिलवानाशी असभ्य वर्तन करतात. ज्युनिअर विश्व चँपियनशिप असताना बृजभूषण सिंह हे या मुलींसोबत एकाच मजल्यावर राहिले होते. ते आपल्या रूमचा दरवाजा उघडा ठेवत असत आणि मुलींना संकोच वाटेल असं वर्तन करत असत. त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही करतो आहोत असंही अंशूने म्हटलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी’; पुण्यातील कुस्तीगीराची मागणी

विनेश फोगाटने काय म्हटलं आहे? –

भारतीय महिला पहिलवानांमध्ये सर्वात चर्चेत असलेल्या विनेश फोगाटने म्हटलं आहे की मी जेव्हापासून या प्रकरणात आवाज उठवला आहे तेव्हापासून ज्या मुलींना त्रास झाला आहे त्या मुली समोर येत आहेत. आम्ही ब्रिजभूषण यांच्याविरोधात पुरावे द्यायलाही तयार आहोत. ब्रिजभूषण सिंह यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसं झालं नाही तर भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांनी तुरूंगात जायची तयारी ठेवावी. आम्ही जे बोलत आहोत ते वास्तव आहे. आमच्यासोबत आता दोन महिला मल्ल आहेत ज्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. जर आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही तर कुस्ती महासंघाचे सदस्य तुरूंगात कसे जातील याची व्यवस्था आम्ही करू असंही विनेश फोगाटने म्हटलं आहे.

बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आरोपांवर ब्रिजभूषण शरण सिंह काय म्हणाले ? –

या संपूर्ण प्रकरणावर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपली बाजू मांडली आहे. कुस्तीपटूंनी लावलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सत्य सिद्ध झाल्यास मला फाशी द्या, असे ब्रिजभूषण म्हणाले. पैलवानांच्या संपामागे एका बड्या उद्योगपतीचा हात असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brij bhushan singh indian olympic association has formed a seven member committee to probe the allegations of sexual harassment against wfi chief brij bhushan sharan singh msr