गुरुवार आणि शुक्रवार (१८ आणि १९ ऑगस्ट) या दोन दिवशी संपूर्ण देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. जन्माष्टमीनिमित्त देशभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनीही दिल्लीतील इस्कॉन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे भेटलेल्या मँचेस्टर युनायटेडच्या एका भारतीय चाहत्याची आणि मँचेस्टर युनायटेडची खिल्ली उडवली.
ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी शुक्रवारी दिल्लीतील इस्कॉन मंदिरातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका मँचेस्टर युनायटेडची जर्सी घातलेल्या भारतीय तरुणासोबत चर्चा करताना दिसत आहेत. हा तरुण मँचेस्टर युनायटेडचा चाहता होता. श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त तो मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आला होता. एलिस यांनी त्याला याबाबद्दल विचारले असता, आपण मँचेस्टर युनायटेडला चांगला खेळ करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी देवाकडे साकडे घालण्यासाठी आलो असल्याचे त्याने सांगितले.
मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्याने दिलेले उत्तर ऐकून अॅलेक्स एलिस यांना हसू आवरले नाही. त्यांनी त्या तरुणाची आणि फुटबॉल क्लबची जोरदार खिल्ली उडवली. ते म्हणाले, “भगवान श्रीकृष्णाची मदत पुरेशी ठरणार नाही. संघाला त्यापेक्षा जास्त काहीतरी करावे लागेल.” पुढे ते व्हिडिओमध्ये असेही म्हणाले, “कोणत्याही संस्कृतीवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. खराब कामगिरी करूनही मँचेस्टर युनायटेड जिंकणार आहे, असे मानण्यासाठी नक्कीच खूप विश्वासाची गरज आहे.”
हेही वाचा – “रात्री दहा पेग दारू प्यायली, दुसऱ्या दिवशी ठोकलं दमदार शतक” विनोद कांबळीचा खुलासा
दरम्यान, इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) मँचेस्टर युनायडेटची कामगिरी चांगली झालेली नाही. गेल्या वर्षी राल्फ रँगनिकच्या मार्गदर्शनाखाली संघाने खराब कामगिरी केली होती. यावर्षी नवीन व्यवस्थापक एरिक टेन हॅगच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा चाहत्यांना होती. पण, ब्रायटन अँड होव्ह अल्बियन आणि ब्रेंटफोर्ड यांच्याकडून मँचेस्टरला सलग दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यामुळे संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे.
मँचेस्टर युनायटेड हा फुटबॉल क्लब देशांतर्गत आणि युरोपियन फुटबॉल सर्किटमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. मात्र, २०१३ मध्ये सर अॅलेक्स फर्ग्युसन क्लबच्या बाहेर पडल्यानंतर, क्लबला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.