पंजाबमधील एका प्रशिक्षित आणि उद्यमशील कबड्डी खेळाडूने त्याच्या प्रसिद्धीमुळे त्याचा पाय गमावला आहे. गावातील प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दलवीर सिंग (२३) या तरुणाने त्याचा पाय गमावला असून यापुढे तो पुन्हा कबड्डी खेळू शकेल नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दलवीर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कॅनडात जाणार होता. परंतु, त्याआधीच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पंजाबच्या लुधियाना येथील धैपई गावात हा प्रकार घडला आहे.
दलवीर सिंग (२३) हा गावातील प्रसिद्ध कबडीपट्टू आहे. अल्पावधीतच त्याने या खेळात प्राविण्य मिळवलं. तसंच, विविध स्पर्धांमध्ये त्याने अनेक पदके जिंकले आहेत. २६ जून रोजी कॅनडातील आंतरराष्ट्रीय सामन्यात तो सहभागी होणार होता. त्यासाठी तो २० जून रोजी रवाना होणार होता. परंतु, १५ जून रोजीच गावातील काही प्रतिस्पर्ध्यांनी त्याच्यावर हल्ला केला, अशी माहिती त्याच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. जोधन पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, दलवीर आणि त्याचा मित्र गुरप्रीत सिंग १५ जूनच्या रात्री त्यांच्या गावी परतत होते. यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या एका गटाने त्यांच्या टाटा इंडिका व्हिस्टा गाडीने मागून दलवीरच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकी नाल्यात पडली आणि दलवीरचे डोके काँक्रीटच्या भिंतीला आणि लोखंडी अँगलवर आदळले. यामुळे त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. “कबड्डीमुळे दलवीरची प्रसिद्ध वाढत होती, त्यामुळे त्याचे शत्रुत्वही वाढत होते. परिणामी गावातील काही प्रतिस्पर्ध्यांनी त्याला धमकी दिली होती. या धमकीनंतरच त्याच्यावर हल्ला झाला”, अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली. याप्रकरणी, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
हेही वाचा >> Yashasvi Jaiswal: “एक दिवस भारतासाठी…”, कधी काळी झाडावर चढून सामना पाहणारा कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी!
दलवीर सिंह याचे वडिल दविंदर सिंग हे एका कारखान्यात कामगार आहेत. त्यांना महिन्याला फक्त १२ हजार रुपये पगार आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी दलवीरवर होती. “तो आमची एकमेव आशा होता… तो प्रसिद्ध होऊ लागला होता. कबड्डी ही त्याची आवड असल्याने तो चांगली कामगिरी करत होता. तो लहानपणापासून कबड्डी खेळत होता आणि आमच्या गावातला एक प्रशिक्षक त्याला प्रशिक्षण देत होता. अलीकडेच त्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आयोजित केलेल्या ‘खेदन वतन पंजाब दिन’ मध्येही भाग घेतला होता. तो २६ जून रोजी कॅनडातील सरे येथे आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेणार होता. परंतु त्यापूर्वीच, १५ जून रोजी त्याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे कदाचित तो पुन्हा कधीच कबड्डी खेळू शकणार नाही”, असं त्याच्या वडिलांनी साश्रू नयनांनी सांगितले. “कोविडच्या काळात, जेव्हा मी बेरोजगार झालो तेव्हा माझ्या मुलाने घर चालवायला मदत करण्यासाठी दोन महिने सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. मग मी त्याला सांगितले की त्याने आता काम करू नये आणि फक्त त्याच्या कबड्डीवर लक्ष केंद्रित करावे. खेळ हे त्याचे हृदय आणि आत्मा होते”, तो पुढे म्हणाला.
अजूनही बेशुद्धावस्थेत
दलदीरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या पायात जखम अधिक बळावल्याने त्याचा एक पाय कापावा लागला आहे. यामुळे त्याच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे. दलदीर शुद्धीवर आल्यानंतर त्याचा पाय कापला गेल्याचे कसे सांगयचे या विवंचनेत त्याचे आई-वडिल आहेत. “डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की त्यांनी त्याचा पाय वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण संसर्ग खूप जास्त होता. तो अजूनही व्हेंटिलेटरवर असून बेशुद्धावस्थेत आहे. आता आपण फक्त त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहोत. सद्दा ताना सब कुछ खतम हो गया (आमच्यासाठी, सर्व काही संपले आहे)”, वडिलांनी सरकार आणि जनतेला आपल्या मुलाच्या उपचाराचा खर्च उचलण्यास मदत करण्याचे आवाहन केले.