वृत्तसंस्था, लेव्हरकूसेन
बायर लेव्हरकूसेन संघाने जर्मनीतील बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धेत संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. लेव्हरकूसेनने अखेरच्या सामन्यात ऑग्सबर्गवर २-१ असा विजय मिळवला.
स्पेनचा माजी मध्यरक्षक झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखालील लेव्हरकूसेन संघाने यंदाच्या हंगामात विविध स्पर्धात अनेक विक्रम मोडले आहेत. लेव्हरकूसेनने यंदा बुंडसलिगामध्ये संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची किमया साधली आणि अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला. त्यांनी या स्पर्धेत २८ सामने जिंकले, सहा सामने बरोबरीत सोडवले आणि एकही पराभव पत्करला नाही. तसेच लेव्हरकूसेनच्या संघाने बायर्न म्युनिकच्या वर्चस्वालाही धक्का दिला आणि आपले पहिले बुंडसलिगा जेतेपद पटकावले.
हेही वाचा >>>IPL 2024 च्या प्लेऑफ्सचे चारही संघ ठरले! ‘क्वालिफायर वन’ आणि ‘एलिमिनेटर’ कोणत्या संघात होणार? जाणून घ्या
ऑग्सबर्गविरुद्धचा सामना संपल्यानंतर लेव्हरकूसेनला बुंडसलिगा विजेत्यांना मिळणारी ढाल देण्यात आली. त्यानंतर अलोन्सो आणि लेव्हरकूसेनचा कर्णधार लुकास हरडेस्की यांनी प्रेक्षकांत जाऊन जेतेपदाचा आनंद साजरा केला. ऑग्सबर्गविरुद्धच्या सामन्यात लेव्हरकूसेनसाठी व्हिक्टर बोनिफेस (१२व्या मिनिटाला) आणि रॉबर्ट अॅन्ड्रिच (२७व्या मि.) यांनी गोल नोंदवले. ऑग्सबर्गचा एकमेव गोल मेर्त कोमूरने (६२व्या मि.) केला.
लेव्हरकूसेनच्या संघाला या हंगामात सर्व स्पर्धात मिळून अपराजित राहण्याची संधी आहे. ते आता जर्मन चषक आणि युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.