भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा तिसरं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर श्रीकांत चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. गुरुवारी जागतिक बॅडमिंटन परिषदेने खेळाडूंच्या मानांकन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये श्रीकांतने ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगला मागे टाकत सर्वोत्तम ३ जणांच्या यादीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

अवश्य वाचा – भरगच्च स्पर्धामुळे सायनाचे बॅडमिंटन महासंघावर टीकास्त्र

किदम्बी श्रीकांतव्यतिरीक्त बी. साई प्रणीतच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या साई प्रणीतने क्रमवारीत १६ वं स्थान पटकावलं आहे. याव्यतिरीक्त एच.एस.प्रणॉयच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाहीये, तो अजुनही दहाव्या क्रमांकावर कायम राहिला आहे. समीर वर्मा, अजय जयराम आणि सौरभ वर्मा या भारतीय खेळाडूंनीही आपलं स्थान कायम राखलं आहे.

अवश्य वाचा – सलग स्पर्धामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम – गोपीचंद

महिला खेळाडूंच्या क्रमवारीतही वर्षाच्या अखेरीस बदल झालेला पहायला मिळत नाहीये. दुबई सुपरसिरीज स्पर्धेतं उप-विजेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे. तर दुसरीकडे ‘फुलराणी’ सायना नेहवालही आपल्या दहाव्या स्थानावर कायम आहे. पुरुष दुहेरी खेळाडूंमध्ये सत्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी ३१ व्या क्रमांकावर राहिली आहे. तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटाकवणारी मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी जोडीने ३२ वा क्रमांक पटकावला आहे. महिला दुहेरीतही आश्विनी पोनाप्पा आणि एन. सिकी रेड्डी जोडीच्या क्रमवारीत कोणतीही सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे आगामी वर्षात भारतीय बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader