भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधुला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून १७-२१, १३-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. गतविजेत्या सिंधुला यिंगने या सामन्यात पुनरागमनाची कोणतीही संधी न देता दोन सरळ सेटमध्ये सहज मात दिली.

सिंधूने गुरुवारी थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा सरळ गेममध्ये पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत ७व्या स्थानावर असलेल्या सिंधूने ४८ मिनिटे चाललेल्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये १०व्या क्रमांकाच्या थायलंडच्या खेळाडूचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला. सहाव्या मानांकित सिंधूचा पॉर्नपावीविरुद्धच्या आठ सामन्यांमधील हा पाचवा विजय होता.

हेही वाचा – VIDEO : हसून हसून दुखेल पोट..! विराटनं घातला इशांतच्या बॅगेत हात अन् मिळालं…!

ताई त्झु यिंगने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा २१-१०, १९-२१, २१-११ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत ताय झूनेच सिंधूला धूळ चारली होती.