आजपासून (२२ ऑगस्ट) जपानमधील टोक्यो येथे बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा २०२२ सुरू झाली आहे. २८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या लक्ष्य सेनने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत पहिल्या फेरीतील सामना जिंकला. लक्ष्यने आपल्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन विटिंगसचा २१-१२, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

त्यापूर्वी, २०१९मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्यपदक विजेत्या बी साई प्रणीतला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रणीतने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चो तिएन चेनला कडवी झुंज दिली. परंतु, त्याला १५-२१, २१-१५, १५-२१ अशा पराभव पत्करावा लागला. गतवर्षी टोक्यो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतही तो सुरुवातीला बाहेर पडला होता.

मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रास्टो आणि ईशान भटनागर या जोडीने जर्मनीच्या पॅट्रिक शिल आणि फ्रांझिस्का वोल्कमन यांच्यावर अवघ्या २९ मिनिटांत विजय मिळवला. भारतीय जोडीने जर्मन जोडीचा २१-१३, २१-१३ असा पराभव केला. तनिषा आणि ईशानचा पुढील सामना थायलंडच्या सुपाक जोमकोह आणि सुपिसारा पावसम्प्रान या १४व्या मानांकित जोडीशी होणार आहे.

हेही वाचा – IND vs ZIM 3rd ODI: शुबमन गिलची तुफान फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्ध केले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

याशिवाय, अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीत मालदीवच्या अमिनाथ नबिहा अब्दुल रज्जाक आणि फातिमाथ नबाहा अब्दुल रज्जाक यांचा २१-७, २१-९ असा पराभव केला. अश्विनी आणि सिक्की यांना दुसऱ्या फेरीत चेन किंग चेन आणि जिया यी फॅन या अव्वल मानांकित चीनच्या जोडीचे कडवे आव्हान असेल.

Story img Loader