BWF World Tour Finals : गुआंगझू येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूने उपांत्य फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला २१-१६, २५-२३ असे पराभूत केले. पहिला गेम सिंधूने सहज जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये इंटानॉन हिने कडवी झुंज दिली. पण अखेर २५-२३ अशा गुणसंख्येने सिंधूने विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत सिंधूची लढत नोझुमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे.
त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या झँग बीवन हिला २१-९, २१-१५ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये सिंधूने बीवन हिला २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर बीवनने सिंधूला दुसऱ्या गेममध्ये चांगली टक्कर दिली. पण अखेर सिंधूच्या अनुभवापुढे तिचे प्रयत्न फोल ठरले. दुसरा गेम २१-१५ असा जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली. तर सलग सहा सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करीत त्याआधीच्या फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूने ताय झु यिंगवर मात केली होती. पहिल्या गेममधील पिछाडीनंतरदेखील चायनीज तैपेईच्या ताय झु यिंगला हरवणे अशक्य असल्याच्या वदंतेला सिंधूने उद्ध्वस्त केले. सिंधूने हा सामना १४-२१, २१-१६, २१-१८ असा जिंकला होता.