ICC World Cup 2023, Points Table: एकदिवसीय विश्वचषकाचा २१वा सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना चार विकेट्सनी जिंकला. न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाचे आकडे फारसे चांगले नव्हते. याबाबत भारतीय संघावर दबाव होता, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने यावेळी कोणतीही चूक केली नाही आणि २० वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत ऐतिहासिक विजय संपादन केला. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
खरे तर २१व्या सामन्यापर्यंत या विश्वचषकात न्यूझीलंड आणि भारत हे दोघेही अपराजित होते आणि चारपैकी चार सामने जिंकले होते. मात्र, या सामन्यानंतर किवी संघाच्या खात्यात पराभवाची नोंद झाली आहे. भारतीय संघ अजूनही अजिंक्य आहे आणि त्याने पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, मात्र आता भारतीय संघाने त्यांचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
सध्याच्या गुणतालिकेत भारताने पाच सामन्यांत पाच विजय मिळवले असून त्यांच्या खात्यावर १० गुण जमा झाले आहेत. भारताची निव्वळ धावगती +१.३५३ आहे. न्यूझीलंडचा संघ पाच सामन्यांत चार विजय आणि आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांची निव्वळ धावगती +१.४८१ आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतही भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यांनी नऊपैकी सात सामने जिंकले. एकात पराभवाला सामोरे जावे लागले तर एक सामना अनिर्णित राहिला. २०१९च्या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी टप्प्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही.
रोहित शर्माच्या टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ गडी राखून आणि तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. पुण्यातील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आणि आता न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्याचवेळी किवी संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नऊ गडी राखून, दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा ९९ धावांनी तर तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा ८ विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर अफगाणिस्तानचा पराभव करून करत आठ गुण मिळवले. मात्र, पाचव्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला.
भारताचे पुढील चार सामने
२९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध इंग्लंड
२ नोव्हेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका
५ नोव्हेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१२ नोव्हेंबर: भारत विरुद्ध नेदरलँड
ऑस्ट्रेलिया पहिल्या चार, पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दोन अप्रतिम विजय मिळवले होते आणि त्यापैकी एकामध्ये ४००+ धावा केल्या होत्या. मात्र, आफ्रिकेला नेदरलँड्सविरुद्ध दारूण पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या विजयाने दक्षिण आफ्रिकेची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह त्यांचे सहा गुण झाले असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची निव्वळ धावगती ही +२.२१२ वर सर्वाधिक आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी श्रीलंकेचा पराभव करून नवव्या क्रमांकावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली होती. यानंतर पाकिस्तानचा पराभव करून संघ सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. त्यांची निव्वळ धावगती ही पाकिस्तानपेक्षा चांगली झाली आहे.
दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून दोघांचे दोन विजय आणि दोन पराभवांसह आठ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा निव्वळ धावगती -०.१९३ आणि पाकिस्तानचा -०.४५६ आहे. पाकिस्तान संघ पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता इंग्लंड संघ चार विजय आणि तीन पराभवांसह दोन गुणांसह सहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरला आहे. बांगलादेशचे चार वरून दोन गुण असून ते सहाव्या स्थानावर घसरले आहे. त्यांनी एक सामना जिंकला असून तीन पराभव पत्करले आहेत. नेदरलँड एक विजय आणि तीन पराभवांसह सातव्या स्थानावर आहे आणि श्रीलंका एक विजय आणि चार पराभवांसह आठव्या स्थानावर आहे. शनिवारी नेदरलँड्सचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. इंग्लंड नवव्या स्थानावर तर अफगाणिस्तान शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.