स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीच्या रणांगणावर ‘अर्जुन’वीर सी. होनप्पा गौडा कुठे आहे, याची जोरदार चर्चा आहे. भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची किमया साधणारे हे माजी संघनायक दबंग दिल्ली संघाला मार्गदर्शन करीत होते. परंतु दबंग दिल्लीचा संघ प्रो कबड्डीत आपले तिन्ही सामने हरला आहे. पण संघासोबत होनप्पा नसल्याचे मात्र सहजपणे अधोरेखित होत आहे. वैयक्तिक कारणामुळे होनप्पा यांनी प्रशिक्षकपद सोडल्याचे दिल्ली संघाने स्पष्ट केले आहे.
होनप्पा यांनी दुसऱ्या हंगामाआधी दिल्लीच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली होती. मागील वर्षी दिल्लीने १४ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले होते. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने काही धक्कादायक विजयांची नोंद केली होती. मात्र स्पर्धा अध्र्यावर आली असताना त्यांना डेंग्यू झाला आणि ते पुढे संघासोबत नव्हते. दुसऱ्या हंगामात दिल्लीचा काशिलिंग आडके चढाईपटूंच्या यादीत अग्रस्थानी होता, तर रवींद्र पहल पकडपटूंमध्ये दुसरा होता. पण उत्तरार्धात खेळाडूंच्या उत्तम वैयक्तिक कामगिरीत सांघिक समन्वयाचा अभाव दिसून आला. ही गोष्ट तिसऱ्या हंगामातसुद्धा प्रामुख्याने दिसून येत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दोन्ही हंगामांआधी ४० दिवसांचे विशेष सराव सत्र होनप्पा यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होता. यंदा नवी मुंबईच्या रामशेठ ठाकूर क्रीडा संकुलात सराव सत्र झाले.
‘‘होनप्पाने वैयक्तिक कारणास्तव तिसरा हंगाम सुरू होण्याच्या आधी प्रशिक्षकपदाची सूत्रे सोडली आहेत. अन्य काही जबाबदाऱ्यांची बांधिलकी जपणे, त्यांना आवश्यक होती. त्यामुळे संघ व्यवस्थापनाशी चर्चेनंतर हा निर्णय त्यांनी घेतला आहे,’’ असे स्पष्टीकरण दबंग दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने दिले आहे.
सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणामधील (साइ) प्रशिक्षक बलवान सिंग हे दिल्लीला मार्गदर्शन करीत आहे. बंगळुरू बुल्स, तेलुगू टायटन्स आणि पुणेरी पलटण अशा तीन संघांकडून दिल्लीचा संघ पराभूत झाला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना बलवान सिंग म्हणाले, ‘‘मी २९ जानेवारीपासून दिल्लीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. संघाच्या बचाव फळीत उणिवा आहेत. याचप्रमाणे सांघिक समन्वय योग्य पद्धतीने
झालेला नाही. परंतु येत्या काही सामन्यांमध्ये आम्ही कामगिरीत सुधारणा करू, यावर माझा विश्वास आहे.’’
होनप्पा गौडाविषयी
१९९५ (मद्रास), १९९९ (काठमांडू) दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व.
१९९८ (बँकॉक) आशियाई क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू.
२०००, २००१ आणि २००३मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व.
२०००मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
अॅकॅडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसकडून कबड्डीमधील योगदानाबद्दल डॉक्टरेट प्रदान.