पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर केला. या विस्तारात विजय गोयल यांच्याकडील क्रीडा मंत्रालयाचा पदभार आता राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे. तर विजय गोयल हे आता संसदीय कामकाज मंत्री असणार आहेत. तर राज्यवर्धन यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदावरुन थेट क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे.
२००४ साली झालेल्या ऑलिम्पीक खेळांमध्ये राज्यवर्धन राठोड यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं. त्यामुळे खेळाडू म्हणून क्रीडा खात्याचा पदभार सांभाळणारे राज्यवर्धन राठोड हे पहिलेच मंत्री ठरलेले आहेत. याआधी क्रीडा मंत्रालयावर एकाही खेळाडूने मंत्री म्हणून काम पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यवर्धन यांच्या रुपाने देशातील क्रीडा समस्यांवर लवकर उपाय शोधले जातील अशी आशा वर्तवली जात आहे.
ऑलिम्पिक खेळांव्यतिरीक्त राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रकुल खेळांमध्ये ३ सुवर्ण, वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत २ सुवर्ण तर आशियाई खेळात १ रौप्यपदक मिळवलेलं आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांच राजकारण आणि त्यांचा कारभार जवळून पाहिलेला असलेल्या राज्यवर्धन राठोड यांना क्रीडा मंत्रालयाचा पदभार देत मोदींनी एक मास्टरस्ट्रोक खेळला असल्याचं बोललं जातंय.
कोण होते याआधी भारताचे क्रीडामंत्री ??
ममता बॅनर्जी – (११९१-१९९३)
उमा भारती – (७ नोव्हेंबर २००० ते २५ ऑगस्ट २००२)
सुनील दत्त – (२००४-२००५)
मणीशंकर अय्यर – (२००५-२००९)
एम.एस. गील – (२८ मे २००९ ते १८ जानेवारी २०११)
अजय माकेन – (१९ जानेवारी २०११ ते २८ ऑक्टोबर २०१२)
जितेंद्र सिंह – (२९ ऑक्टोबर २०१२ ते २५ मे २०१४)
सर्बानंद सोनोवाल – (२० मे २०१४ ते २३ मे २०१६)
जितेंद्र सिंह – (२३ मे २०१६ ते ५ जुलै २०१६)
विजय गोयल – (५ जुलै २०१६ – आजपर्यंत)